>> ऐश्वर्य पाटेकर
कोकणच्या गावमातीची स्पंदने आपल्या शब्दांतून उजागर करणारा संवेदनशील लेखक म्हणून जे.डी. पराडकर हे नाव आता मराठी साहित्यात सर्वश्रुत झाले आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून कोकणला शब्दांच्या माध्यमातून चित्रांकित केले आहे. कोकणचा निसर्ग, तेथील माणूस, त्याच्या भावभावना, गावमातीचे अनोखे गंधसंवेदन यांस अतिशय ताकदीनं त्यांनी आपल्या लेखणीत बद्ध करून वाचकांपर्यंत पोहोचवले आहे आणि त्याचे वाचकांनी चांगले स्वागतही केले आहे.
हायटेक काळात पैशांच्या बळावर अतोनात सुविधा आपल्या दिमतीला आल्या आहेत. मात्र आपण मोलाचे काही गमावून बसलो आहोत याची जाणीव व्हायला फार वेळ लागतो. तेव्हा हातातून सारे काही निसटून गेले आहे हे आपल्याला जाणवते. आपल्यातून आधी आपण गाव गमावून बसलो, संवेदना गमावून बसलो. अशा काळात जे. डी. पराडकर यांच्यातील लेखक तुम्हाला पुन्हा त्या जगात नेऊन तुमच्या अंतर्मनाचा तळ ढवळून काढत तुम्हाला पुन्हा त्या दिवसांपाशी घेऊन जातो. आपण जे जिथे सोडून आलो आहे, त्याच्याशी साक्षात उभे करतो.
कोकणच नाही, तर कुठल्याही गावमातीत जगलेल्या माणसाला हे लिखाण आपल्याच भावभावनांचे प्रतिबिंब वाटेल. यातच लेखक म्हणून जे. डी. पराडकर यांचे यश आहे. त्यांनी आठवणींचे उत्खनन करून जो ओलावा ‘वेध अंतर्मनाचा’ या ललित गद्यातून समोर ठेवला आहे, हे पुस्तकही त्यास अपवाद नाही.
मोठमोठी शिखरे पादांत करणारी माणसे तुम्हास भेटू शकतात. मात्र माणसाच्या मनापर्यंत पोहोचणे ही म्हणावी तितकी सोपी गोष्ट नाही. संवेदनशीलता आणि भावनिकता ज्या माणसाकडे असेल त्यास ही गोष्ट अवघड नाहीच. जे. डी. पराडकर हा लेखक पराकोटीचा भावनिक असल्याने कोकणच्या गावमातीची शिदोरी आपल्या समोर घेऊन आला आहे.
वेध अंतर्मनाचा लेखक : जे. डी. पराडकर
प्रकाशन : चपराक प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 128 किंमत : रु.250