लोकलखाली जाणाऱ्या प्रवाशाचे वाशी रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

लोकल फलाटावर थांबण्यापूर्वीच उतरण्याची घाई करणाऱ्या एका प्रवाशाचा पाय घसरला आणि तो लोकल आणि फलाट यांच्या फटीमध्ये सापडला. हा प्रकार वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रवाशाला बाहेर खेचले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. हा प्रकार हार्बर रेल्वे मार्गावरील गोवंडी स्थानकात घडला आहे.

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानिमित्ताने वाशी रेल्वे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे, महिला पोलीस हवालदार निमगिरी, मंजुश्री देव हे गोवंडी रेल्वे स्थानकावर बंदोबस्तासाठी होते. सायंकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलच्या दिशेने निघालेल्या लोकलने गोवंडी स्थानकात प्रवेश केला. लोकल फलाटावर थांबण्यापूर्वीच एका प्रवाशाने उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अंदाज न आल्याने तो घसरून पडला. त्याने लोकलच्या दरवाजाखालील भागाला पकडले होते. मात्र याचमुळे लोकल आणि फलाट यादरम्यानच्या अरूंद जागेत तो पडू शकत होता. ही घटना पाहताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे, महिला पोलीस हवालदार निमगिरी आणि देव यांनी धावत जाऊन त्याला पकडले व लोकलपासून खेचून फलाटावर सुरक्षित आणले, अशी माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली.

…तर मोठा अनर्थ घडला असता

लोकल गोवंडी स्थानकात येत असतानाच या प्रवाशाने उतरण्याची घाई केली. त्यामुळे त्याचा पाय घसरला आणि तो फलाट आणि लोकलच्या गॅपमध्ये सापडला. मात्र त्याच ठिकाणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस तैनात असल्यामुळे त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्रवाशाला बाहेर खेचले. जर पोलीस तिथे नसते तर मोठा अनर्थ घडला असता अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.