
सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती एका महिलेची. या महिलेने एकटीने माऊंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केला आहे. तिचे नाव आहे वासंती चेरुवेटिल आणि वय फक्त 59 वर्षे. आहे की नाही कमाल. केरळच्या वासंती चेरुवेटिल यांनी एकटीने एव्हरेस्टवर चढाई केली. तेही कोणतेही प्रशिक्षण न घेता. केवळ यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून त्यांनी टिप्स घेतल्या. त्यामुळेच त्या चर्चेत आल्या आहेत.
केरळची वासंती चेरुवेटिल व्यवसायाने शिंपी आहेत. माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी कुठलेही प्रोफेशनल ट्रेनिंग घेतले नाही. फक्त आव्हानांसाठी स्वतःला तयार केलं. त्यांनी यूट्यूबवरचे काही व्हिडीओ पाहिले आणि टिप्स घेतल्या. चार महिने त्यांची अशा पद्धतीने तयारी सुरू होती. या मोहिमेसाठी त्या 15 फेब्रुवारीला निघाल्या. वासंती चेरुवेटिल यांनी 15 फेब्रुवारी रोजी नेपाळमधील सुर्वे येथून आपले मिशन सुरू केले, तर 23 फेब्रुवारी रोजी त्या साऊथ बेस कॅम्पला पोहोचल्या. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. या यशाबद्दल वासंती म्हणाल्या, मी तीन महिने सराव करत होते. दररोज संध्याकाळी 5 ते 6 तास पायी चालायचे. जेव्हा मी माझ्या मित्रमंडळींना सांगायचे की, मी एव्हरेस्टची तयारी करतेय, तेव्हा त्यांना विश्वास बसायचा नाही. या प्रवासात अनेक अडचणी आल्या. कधी हवामान खराब असायचे.
वासंती यांनी अरुंद रस्ते, खोल दरी, दम लागणे अशा अनेक समस्यांना तोंड दिले. त्या दिवसाला 6 ते 7 तास चढाई करायच्या आणि मोठा ब्रेक घ्यायच्या. त्यांना वेळ लागत होता. त्या काठीचा आधार घ्यायच्या. काही पावलं चालल्यानंतर थांबायच्या. वासंती यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एव्हरेस्ट मिशनचा फोटो शेअर केला असून तो खूप व्हायरल होतोय. फोटोमध्ये त्या पारंपरिक कसावू साडी परिधान करून तिरंगा फडकवताना दिसत आहेत. गेल्या वर्षी त्या थायलंडला गेल्या होत्या. आता त्याचे पुढचे ध्येय चीनच्या ग्रेट वॉलला भेट देणे आहे.