>> रविप्रकाश कुलकर्णी
एक काळ होता, सकाळी उठल्या उठल्या हात जोडून म्हटलं जायचं…
‘कराग्रे वसते लक्ष्मी; करमध्ये सरस्वती
करमुले तु गोविंदा; प्रभाते करदर्शनम्’
पण आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही अनेक गोष्टी सोडून दिल्या. तसंच प्रत्येकाची सकाळ हल्ली वेगवेगळी झालेली आहे आणि त्यामुळे आमचा हा संस्कार जवळ जवळ विसरल्यात जमा आहे. ते जाऊ द्या, पण हल्ली प्रत्येकाची सकाळ केव्हा ना केव्हा तरी होते. तेव्हा आम्ही काय करतो? व्हॉट्सअॅप दर्शनम्! तर परवा म्हणजे नेमकं सांगायचं, तर 26 मार्चला व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. खरं सांगायचं तर ते लिहिण्याचे कष्टदेखील न घेता कॅलेंडरवरील 26 तारखेभोवती गोल करून वसंतोत्सव आरंभ या शब्दासमोर शुभेच्छा असं लिहून त्याचा फोटो मला फॉरवर्ड करण्यात आला होता. आपण किती यांत्रिक होत चाललोय किंवा यंत्राच्या आधीन होतोय असं तर हे नाही? तेव्हा आठवल्या त्या कविवर्य द. भा. धामणस्करांच्या ओळी…
‘वसंत येतो तेव्हा फुले येतात
असे पुस्तकात वाचलेले;
फुले येतात तेव्हा वसंत असतो,
हे स्वत पाहिलेले…’
थोडक्यात, स्वतच्या पलीकडे, आजूबाजूला पाहिलं तर निसर्गाचे इतके विभ्रम खुणावत राहतात की, जणू आनंदाचे निधानच सापडते. खरं तर ही गुरुकिल्लीच आहे. ज्याने आत्मसुखाची कवाडे एकामागोमाग एक उघडलेली दिसतील. हा वसंतोत्सव पायघडय़ा घालतो ते चैत्राच्या स्वागतासाठी. ते वातावरणच इतके उत्फुल्ल असते. अशा वेळी कवी धामणस्कर म्हणतात, हेही आवश्यक असते, पण त्याचे प्रत्यंतर तर ते कसे देतात पहा…
‘मी पंचांगाला चैत्र कधी विचारलेच नाही
झाडाची पोपटी पालवी मला
अधिक विश्वासार्ह वाटली
सर्वसाक्षी आकाशालाच विचारावेत
असे प्रश्न ग्रहताऱयांना विचारू नयेत
हे उशिरा उमगलेलेही बरे असते,
झाडांचे प्रश्न झाडांना विचारावेत,
पाखरांचे पाखरांना,
त्यापूर्वी वाचलेले सर्व फेकून द्यावे,
स्वतसाठी हेही आवश्यक असते.’
पण ही गोष्ट झाली जाणत्यांची, पण त्यांच्या पलीकडे असलेल्यांचं काय? महाकवी बिहारीच्या एका ‘गुलाबोन्योक्ती’मध्ये त्याचे उत्तर आहे…
‘वे न इहां नागर बडे, जिन आदर तो आब।
फुल्यौ अनफूल्यौ भयौ, गंवई गांव गुलाब।।’
याचा अर्थ आहे, हे गुलाब पुष्पा, तुझ्या गुणांचा आदर होईल असे सुसंस्कृत लोक इथे नाहीत. या गावंढळ गावात तुझे फुलणे हे न फुलण्यात जमा होईल. यातून मग मार्ग कसा काढावा? आपल्या पूर्वसुरींनी या समस्येचा सामना करत मार्ग काढलाच की! ते अनुभवामृत मुक्त मनाने त्यांनी वाटले. ज्यात दुर्गा भागवतांचं ‘ऋतुपा’ येतं, विश्वास वसेकरांचं ‘ऋतू बरवा’ येतं, श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांचं ‘आसमंत’ येतं. अशा वाटेवरून चालायला लागलं की, आपोआपच पायवाटा भेटतात. या बदललेल्या काळाचं प्रतिनिधित्व करतो तो बहावा! या बहाव्याचं कोडकौतुक सोलापूर आकाशवाणीवरून गीता जोशी यांनी केलेलं आहे.
रंगपंचमी सरली, बहाव्याची लागे ओढ
मना कनक रंगाचे, कसे लागले वेड
असा कसा रे बहाव्या, आधी नि:संग जाहला?
मग बघता बघता, स्वर्णमृग झळकला
किती किती पाहू तुला, दोन डोळे रे अपुरे
सुवर्ण हे मुलायम, कसे घडवू दागिने?
पीत नाजूक फुलांचा, जणू कशिदा घडीव
किती अम्लान अमल, अमलतास नाव सार्थ
हे शब्द ऐकून आठवले ते कवी अभिराम अंतरकरांचे शब्द…
निसर्गानेच काही योजून, पेरले असावेत का
हे शांतिदूत जागजागी…
अभिराम अंतरकर यांनी हे कोणाला उद्देशून म्हटले आहे? ते म्हणतात… ग्रीष्मातल्या दाहक दुपारी
बहरला आहे एका वळणावर
मोहक पिवळा लॅबर्नम
हे वाचून मनात आलं, कवीला बहावा, अमलतासऐवजी लॅबर्नम हे नाव कसं आठवलं असेल? यावरून आठवलं, मुंबईला भारतीय विद्याभवनच्या जवळ लॅबर्नम रोड आहे. एकदा सगळ्या इंग्रजी नावांची उच्चाटन करण्याची लाट आली. त्यात हे पण नाव आलं. तेव्हा लॅबर्नम म्हणजे बहावा किंवा अमलतास हे सांगायला लागलं! मात्र तेव्हा ‘बहावा रस्ता’ असं नामकरण करावं असं कुणाला कसं काय वाटलं नाही? अर्थात हेही तितकंच खरं की, फळाफुलांची नावं असलेले रस्ते किती ठिकाणी असतील? फुललेला आसमंत पाहता पाहता हेदेखील पाहायला हरकत नाही.