वसंत मोरे शिवबंधनात, ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवबंधन बांधून घेतला पक्षात प्रवेश

वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांनी आज हाती शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी मोरे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेत आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. आता पुणे पुन्हा भगवामय करा, असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करत वसंत मोरे यांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत पुण्यातील मनसेचे अनेक शाखाध्यक्ष, शहराध्यक्ष आदी पदाधिकाऱयांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिकांचे स्वागत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या पक्षात जाऊन काय वागणूक मिळते, सन्मान मिळतो का, याचा अनुभव घेऊन अधिक परिपक्व होऊन तुम्ही शिवसेनेत परतला आहात. त्यामुळे तुमची जबाबदारी आता वाढली आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी त्यांना म्हणाले. पुण्यामध्ये पूर्वीपेक्षा कित्येक पटीने शिवसेना वाढवा, हीच तुम्हाला शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा आहे, असे उद्धव ठाकरे मिश्कीलपणे म्हणाले. राज्यातील सत्ताबदलाची सुरुवात पुण्यातून व्हायला हवी, असे सांगतानाच, लवकरच आपण पुण्यामध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेऊ, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘वसंततात्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यावर शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले की, आता आणखी आगे बढो नको… वसंत मोरे बरेच पुढे आले असून त्यांच्या डेस्टीनेशनपर्यंत, ‘मातोश्री’च्या मंदिरापर्यंत पोहोचले आहेत. आता सगळय़ांनी मिळून पुण्यातील शिवसेना पुढे नेऊया, असे आवाहनही त्यांनी केले.

मी शिवसेनेत प्रवेश केला असे अनेकजण म्हणताहेत. पण मी प्रवेश केलेला नाही तर स्वगृही परत आलोय, अशा भावना यावेळी वसंत मोरे यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.