मकर संक्रांतीच्या सणानिमित्त शहरात विविध प्रकारचे पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याही वर्षी पालिकेने धारदार आणि जीवघेण्या चिनी मांजावर बंदी घातली आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीचा अभाव असल्यामुळे शहरात खुलेआम चिनी मांजाची विक्री होत आहे. त्यामुळे संक्रांतीच्या काळात नागरिक तसेच पक्ष्यांच्या जीवाला धोका आहे. वसई-विरार महानगरपालिका चिनी मांजावर केवळ कागदोपत्री बंदी घालत असल्याचा आरोप अनेक सेवाभावी संस्थांनी केला आहे.
चिनी व नायलॉन मांजा अत्यंत धारदार असल्याने पक्ष्यांच्या गळ्याला कापण्याचे प्रकार घडतात. त्यांच्या पंखांना गंभीर दुखापत होऊन अनेक पक्ष्यांना प्राण गमवावे लागतात. तुटलेल्या मांजामुळे नागरिकदेखील अपघातग्रस्त होतात. दुचाकीस्वारांच्या गळ्याला मांजा अडकून अनेकांचा जीव गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. गेल्या वर्षी अनेक सेवाभावी संस्था व प्राणी भाईंदर ते वसई संघटनांनी मुंबई, मीरा विरारदरम्यान 14 व 15 जानेवारी रोजी 25 पेक्षा जास्त ठिकाणी जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पमध्ये 800 जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात आले होते. तर एक हजाराहून अधिक पक्ष्यांचा जीव गेला होता.
14, 15 जानेवारीला कॅम्प
गेल्या वर्षी विरार, भाईंदर पूर्व पश्चिम, विनय नगर, गोरेगाव, विलेपार्ले, चर्नी रोड, सी. पी. टँक, भुलेश्वर, मरिन लाईन्स येथे शेकडो कबुतरे चिनी मांजाच्या तावडीत सापडून जायबंदी झाले होते. पालिकेची चिनी मांजावरील बंदी तोंडदेखली असल्याने अनेक सेवाभावी संस्था व पक्षीप्रेमींनी मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी १४, १५ जानेवारी रोजी ठिकठिकाणी कॅम्प आयोजित केले आहेत.