वसई रेल्वे टर्मिनस सायडिंगला; भाजपची प्रसिद्धी एक्स्प्रेस जोरात, प्रशासन म्हणते मंजुरी मिळेल तेव्हा काम सुरू करू!

वसई रेल्वे टर्मिनसला परवानगी मिळाली असून लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल असा गाजावाजा करत गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची प्रसिद्धी एक्स्प्रेस जोरात सुरू आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात भाजपच्या या खोट्या प्रसिद्धीचा पर्दाफाश झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात टर्मिनसचा प्रस्ताव मंडळाच्या मान्यतेखाली असून मंडळाची मंजुरी मिळेल तेव्हा काम सुरू करू, असा उल्लेख करत भाजपच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडला आहे. मात्र या प्रसिद्धीच्या खेळात वसई रेल्वे टर्मिनस मात्र सायडिंगला गेली आहे.
पश्चिम रेल्वेच्या वांद्रे, कुर्ला, दादर आणि सीएसटी या रेल्वे स्थानकातून 103 लांबपल्ल्यांच्या गाड्या प्रवास करतात. त्यापैकी 43 मेल-एक्स्प्रेस गाड्या दररोज वसई रोड रेल्वे स्थानकातून जातात. त्यातील उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या 60 गाड्या वसई रेल्वे स्थानकात इंजिन बदलतात. या प्रक्रियेला 50 मिनिटांहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे वसई रोड रेल्वे स्थानकाला टर्मिनस बनवावे अशी मागणी प्रवाशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. 2018 मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी रेल्वे टर्मिनसची घोषणा करून 2023 पर्यंत हे टर्मिनस पूर्ण केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. हे काम दोन टप्प्यात पूर्ण होणार असून पहिल्या टप्प्यात बांधकाम करून परिसराचा विकास आणि दुसऱ्या टप्प्यात पूर्ण टर्मिनस उभारण्यात येणार होते. या टर्मिनसला मंजुरी मिळाल्याचे सांगत भाजप नेत्यांनी स्वतःची जोरदार प्रसिद्धी केली. मात्र रेल्वे प्रशासनाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून भाजपच्या या प्रसिद्धीला पूर्णविराम दिला आहे.

काय आहे पत्रात ?
पश्चिम रेल्वेच्या उपमुख्य प्रबंधक संदीप श्रीवास्तव यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात वसई रेल्वे टर्मिनसचा प्रस्ताव हा रेल्वे मंडळाच्या मान्यतेखाली असल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वे मंडळाकडून मंजुरी मिळेल तेव्हा हे काम केले जाईल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रामुळे भाजपचा खोटारडेपणा उघड पडला आहे. भाजपने प्रसिद्धीपेक्षा रेल्वे टर्मिनसला मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. – जॉय फरगोस, आम आदमी पार्टी-