लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा काटा काढला, दोन महिन्यानंतर खुनाला वाचा फुटली

महाजन पाडा येथील रॉयल पार्क इंडस्ट्रीजवळील नाल्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचे समोर आले आहे. प्रिया सिंग असे मृत तरुणीचे नाव असून ती मूळची उत्तर प्रदेशातील आहे. लग्नाचा तगादा लावल्याने तिचा काटा काढल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी प्रियकर अमित सिंग याला अटक केली.

प्रिया सिंग ही बेपत्ता झाल्याची तक्रार उत्तर प्रदेशमध्ये दाखल करण्यात आली होती. याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तिचा शोध घेतला. प्रिया ही वसईत राहणाऱ्या अमित सिंग याला उत्तर प्रदेशहून भेटायला जात असल्याची माहिती तपासात उघड झाली. त्यानुसार वसई पोलिसांनी अमित सिंग याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली.