खार तीन बंगला परिसरातील रेल्वेची जमीन सरकारने ताब्यात घ्यावी, वरुण सरदेसाई यांनी सरकारला केली सूचना

वांद्रे पूर्व येथील खार तीन बंगला परिसरात गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेला एसआर प्रकल्प मार्गी लावण्याची गरज आहे. पण रेल्वेच्या जमिनीवर या झोपडय़ा आहे. राज्य सरकारने रेल्वेला ट्रान्सफर फी भरून ही जमीन ताब्यात घ्यावी, अशी सूचना शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.

वांद्रे पूर्व येथे खार तीन बंगला  या परिसरात 1050 झोपडय़ा आहेत. या झोपडय़ांचे पुनर्वसन गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. कारण ही जमीन पश्चिम रेल्वेच्या मालकीची आहे. ही जमीन राज्य सरकारच्या मालकीची होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार सुरु आहे. रेल्वेनेही तयारी दर्शवली आहे. पण जोपर्यंत ही जमीन राज्य सरकारकडे येत नाही तोपर्यंत या जागेवर एसआरए  प्रकल्प राबवता येणार नाही. या सर्व झोपडय़ांचे बायोमेट्रिक सर्व्हे पूर्ण झालेला  आहे. सर्वांची मंजुरी आहे, पण तरीही प्रकल्प रखडला आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पात ज्या प्रकारे ट्रान्सफर फी देऊन जशी रेल्वेची जमीन  राज्य सरकारने स्वतःकडे हस्तांतरित करून घेतली त्याच पद्धतीने खार तीन बंगला परिसरातील रेल्वेची जमीन ट्रान्सफर फी भरून आपल्याकडे घ्यावी. त्यामुळे या वसाहतीमधील रहिवाशांना त्यांची हक्काची घरे मिळवता येतील, अशी मागणी त्यांनी केली. त्याचवेळेस या भागातील बेहरामनगरची गावठणाची जमीन गावठाण म्हणूनच दाखवावी. त्यासाठी पुन्हा सर्व्हे करावा अशी सूचना वरुण सरदेसाई यांनी सरकारला केली.