
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्षाच्या जे पोटात आहे तेच ओठावर आले आहे. भैयाजी जोशी यांच्या विधानावरून आरएसएस, भाजपचा मुंबईला तोडण्याचा डाव अधोरेखित झालेला आहे, असा घणाघात युवासेना सचिव, आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानभवन येथे माध्यमांशी बोलताना केला.
मुंबईत विविध राज्य आणि प्रांतातील लोक राहतात. विविध भाषा बोलतात. मुंबईत अनेक भाषा आहेत. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, अशी मुक्ताफळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी उधळली होती. या विधानाचा वरुण सरदेसाई यांनी निषेध केला.
ते पुढे म्हणाले की, भाजपकडे मोठे बहुमत असताना मुंबई ही मराठी माणसाची नाही, मुंबईची भाषा मराठी नाही असे जाहीर विधान आरएसएसच्या नेत्याकडून होत असेल तर त्यांचे पुढचे डाव काय आहेत आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे हे समोर आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते की, भाजपला मुंबई तोडायची आहे. मराठी माणसाला तोडायचे आहे. मुंबईमध्ये भाषे-भाषेत वाद निर्माण करायचे आहेत. तेव्हा भाजपचे लोक सांगायचे की हे उगाचच बोलतात. पण आता भाजपच्या जे पोटात होते ते ओठावर आले आहे.
मुंबईची, महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. इतर भाषा बोलणारे लोक इथे येतात, राहतात. पण कुणीही मुंबईची भाषा गुजराती वगैरे आहे असे बोलण्याची हिंमत करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई, महाराष्ट्राची भाषा मराठीच; भैयाजी जोशी यांनी माफी मागावी, आदित्य ठाकरे कडाडले