लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर हॉकी संघाबाहेर फेकला गेलेल्या हिंदुस्थानचा बचावपटू वरुण कुमारचे हिंदुस्थान हॉकी संघात पुनरागमन झाले आहे. या प्रकरणातून निर्दोष सुटल्यामुळे वरुणला मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी जर्मनीविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात बंगळुरू पोलीसांनी वरुणवर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक आणि आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी संघात वरुणला स्थान मिळू शकले नाही. मात्र या प्रकरणी वरुणला क्लीन चिट मिळाली असून त्याचा संघात समावेश करण्यात आल्याचे हॉकी इंडियातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान विश्रांती घेतल्यानंतर मनदीप सिंग फॉरवर्ड लाइनवर परतला आहे. त्याच्यासोबत सुखजित सिंग, अभिषेक, आदित्य अर्जुन लालगे, दिलप्रीत सिंग आणि शिलानंद लाक्रा असतील. ‘आम्ही जर्मनीविरुद्ध खेळण्यासाठी खूप उत्सुक आहोत. अनुभवी संघ निवडला असून या संघात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारे अनेक खेळाडू आहेत. राजिंदर आणि आदित्य आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण करणार असून त्यांनी शिबिरात चांगली कामगिरी केली आहे,’ असे प्रशिक्षक व्रेग फुल्टन यांनी सांगितले.
हिंदुस्थानी संघ
गोलरक्षक : कृष्ण बहादूर पाठक आणि सूरज करकेरा.
बचावपटू : हरमन्नप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, वरुण कुमार, सुमित, नीलम संजीप सेस आणि संजय.
मिडफिल्डर : मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, विष्णू कांत सिंग, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, मोहम्मद राहीन मौसीन आणि राजिंदर सिंग.
फॉरवर्ड : मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, अभिषेक, आदित्य अर्जुन लालगे, दिलप्रीत सिंग आणि शिलानंद लाक्रा.