वांद्रे (पूर्व) स्टेशन ते बीकेसी, म्हाडा व इतर भागात रहिवाशांची सतत वर्दळ असते. या भागात बांधलेला स्कायवॉक धोकादायक झाल्याने पाडण्यात आला. परिणामी ऑफीसला जाणाऱया-येणाऱयांची व नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या भागात पुन्हा एकदा अद्ययावत स्कायवॉक बांधावा, अशी मागणी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.
वांद्रे पूर्व मतदारसंघात 2008मध्ये स्कायवॉक बांधण्यात आला होता. अनंत काणेकर मार्गावरील स्कायवॉक हा वांद्रे पूर्व स्थानक ते शहरातील इतर भागांना जोडत होता. पण हा स्कायवॉक धोकादायक झाल्याने 2021मध्ये पाडण्यात आला. आज 2024 संपत आले पण अजूनही या स्कायवॉकची मुंबई महानगर पालिका किंवा एमएमआरडीएच्या माध्यमातून पुनर्बांधणी झालेली नाही. माझ्या मतदारसंघात बीकेसीसारखे कमर्शिअल हब, म्हाडाचे मुख्यालय, कलेक्टर ऑफीस, एसआरए मुख्यालय आहे. या भागात सतत वर्दळ असते. सकाळी व संध्याकाळी वांद्रे स्टेशनवरून नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे एमएमआरडीए किंवा महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन अद्ययावत स्कायवॉक बांधून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी वरुण सरदेसाई यांनी केली.