>> वैभव शिरवडकर
कलिना विधानसभा क्षेत्रात येणाऱया कुर्ला पश्चिम आणि सांताक्रुझ विमानतळ परिसरातील हजारो झोपडय़ा, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी गेल्या काही वर्षांपासून शिवसेना संसदेत सातत्याने आवाज उठवत आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय पोतनीस यांच्या अथक प्रयत्नांमुळे सुमारे अडीच हजार झोपडीधारक पुनर्वसनासाठी पात्रही झाले आहेत. उर्वरित झोपडीधारकांचे पुनर्वसनही करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. चार वेळा नगरसेवक आणि दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले संजय पोतनीस शिवसेनेचे आमदार म्हणून तिस-यांदा हॅटट्रिक साधण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपकडून अमरजित सिंह, मनसेकडून संदीप हुटगी तर वंचितकडून मोहम्मद सिद्धिकी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
कोरोना काळात दुसऱया लाटेत पोतनीस यांनी आमदार निधीतून कलिना मुंबई विद्यापीठात लहान मुलांसाठी 100 बेडचे कोव्हीड हॉस्पिटल उभारले. सेंटरमध्ये मुलांसाठी खेळणी, मनोरंजनासाठी टीव्ही तसेच पालकापैकी एकाला राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या रुग्णालयाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.
संजय पोतनीस यांनी कुर्ला पश्चिम येथील शीतल तलाव आणि परिसराचा कायापालट केला आहे. आमदार निधीतून तलावात जाणाऱया सांडपाण्यासाठी वेगळी मलनिस्सारणवाहिनी (सिव्हरेज लाईन) टाकून ती एलबीएस रोडवरील गटार लाईनबरोबर जोडण्यात आली. त्यामुळे तलाव कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त झाला. तलावाभोवती जॉगिंग ट्रक बनवले, ज्येष्ठ नागरिकांसाठी तलावात तरंगता कट्टा बनवला. तलाव परिसरात लहान मुलांसाठी खेळणी, वाचनालय, ओपन जिम, शौचालय, मुतारी बांधण्यात आली. तलावाभोवती कास्टींगच्या सुंदर डिझाईनचे ग्रिल बसवून दिव्यांची व्यवस्था केली. भकास झालेल्या परिसराला नवी झळाळी मिळवून दिली.
विमानतळ परिसरातील हजारो झोपडय़ा आणि धोकादायक इमारतींचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. सगळे अधिकार पेंद्र सरकारकडे असल्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला या झोपडय़ांचा पुनर्विकास करणे शक्य होत नाही. दाटीवाटीच्या वस्ती असल्यामुळे मलनिस्सारण वाहिनी, पाण्याच्या मोठया लाईन टाकता येत नाहीत. मात्र, पोतनीस यांनी सरकारकडे पाठपुरावा करून सुमारे अडीच हजार झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, सरकार, महापालिका, एसआरएकडे पुनर्वसनासाठी पीएपी नाही. माहुलच्या जागेत जायला रहिवासी तयार नाहीत तर कोर्टाच्या स्थगितीमुळे स्थलांतराला बंदी आहे तसेच कुर्ला येथे 18-20 वर्षांपूर्वी बांधलेल्या झोपडय़ा आता राहण्यायोग्य राहिलेल्या नाहीत. त्यामुळे स्थलांतराचा प्रश्न रखडला आहे. या पुढेही खासदार वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करून संसदेच्या माध्यमातून विमानतळ परिसरातील रहिवाशांचा प्रश्न मांडून तो कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ते आग्रही आहेत.
गरीब रुग्णांसाठी महापालिकेच्या व्ही. एन. देसाई आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालयाला पोतनीस यांनी अत्यंत सुसज्ज अशा दोन कार्डियाक रुग्णवाहिका दिल्या. लीलावतीसारख्या रुग्णालयात सर्वसामान्यांच्या 24 मोफत बायपास शस्त्रक्रिया केल्या आहेत.
विभागातील दहावी आणि बारावीतील 27 गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यांनी 2007 सालापासून 15 मुलांना दत्तक घेतले असून त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलला आहे.