महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की नाही? काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरून खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल

आम्ही संविधान मानणारे लोक आहोत आणि संघ भाजपचे लोक हे मनुस्मृती मानणारे लोक आहेत अशी टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. तसेच मुंबईत काँग्रेस कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या प्रकरणी महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवालही गायकवाड यांनी विचारला.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का, पोलिसांचं राज्य आहे का? आणि राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत? संसदेत आम्ही अदानीचा मुद्दा मांडला आणि नेहमी शांततेने आंदोलनं केली. राज्यसभेत अमित शहा यांनी आंबेडकरांवर वादग्रस्त विधान केलं. त्यावर सगळ्यांनी निषेध व्यक्त केला. अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी आम्ही केली होती. संघ आणि भाजपची भुमिका ही नेहमीच मनुस्मृतीवादी राहिलेली आहे. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. ज्या पद्धतीने अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख केला, ही बाब आम्हाल बिल्कूल आवडलेली नाही. महापुरुषांबाबात यांच्या मनात काय भावना आहे हे आम्हाला कळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा यांनी बांधला आणि अवघ्या आठ महिन्यांत तो पुतळा कोसळला. डॉ. आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे फॅशन झालीये असे विधान अमित शहा यांनी केले. संसदेच्या प्रांगणात आम्ही बाबासाहेबांचा फोटो घेऊन आम्ही आंदोलन करत होतो. संददेत जाताना आम्हाला रोखलं गेलं. नेहमी भाजपचे खासदार जेव्हा जातात तेव्हा आम्ही जाण्यासाठी रस्ता देतो असे गायकवाड म्हणाल्या.

तसेच सायंकाळी मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाला. आमचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत, महिला कार्यकर्त्या दहशतीखाली आहेत. हे राजकारण कुठे चाललंय? राज्यात हुकुमशाही सुरू आहे का? कोणीही कुणाच्या कार्यालयात घुसतंय आणि काहीही करतंय. पोलीस काय करत आहेत, गृहमंत्री काय करत आहेत? भाजपने कधीच संविधान मानलं नाही. भाजपने हा भ्याड हल्ला केला आहे. आम्ही घाबरणार नाही, कारण आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि आम्ही लढणार आणि न्याय मिळवूनच राहणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.