>> वर्षा चोपडे
बिहारमधील पैमूर (भबुआ) जिह्यातील रामगढ गावातील देवी मुंडेश्वरी भवानी व महामंडलेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर भगवानपूर टेकडीवर सुमारे 600 फूट उंचीवर वसलेल्या या प्राचीन मंदिराचे आगळे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे.
देशातील सर्वात प्राचीन मंदिर देवी मुंडेश्वरी भवानी व महामण्डलेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर बिहारमधील पैमूर (भबुआ) जिह्यातील रामगढ गावातील भगवानपूर टेकडीवर सुमारे 600 फूट उंचीवर आहे. हे मंदिर ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध असून ते पंवरा डोंगराच्या दऱयांमध्ये वसलेले आहे. इथले तलाव आणि धबधबे या भागाच्या सौंदर्यात भर घालतात. येथे एक प्राचीन किल्लादेखील आहे.
रामगढ हा प्रदेश ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून शक्तिशाली मगध साम्राज्याचा भाग बनला होता. मुंडेश्वरी मंदिरातील शिलालेखात असे म्हटले आहे की, सत्ताधारी प्रमुख राजा उदयन हा या प्रदेशाचा राज्यपाल होता. माहितीनुसार 635 या शतकातील हिंदू शिलालेख मंदिरात सापडले. ऐतिहासिक माहितीनुसार 1904 च्या दरम्यान ब्रिटिश पर्यटक आर. एन. मार्टिन आणि फ्रान्सिस बुकानन यांनी या मंदिरास भेट दिली. प्रसिद्ध चिनी यात्रेकरू ह्युएन-तांग इसवी सन सातव्या शतकात या भागात राहत होता, असेही म्हटले जाते.
असे म्हणतात येथे देवीने चंड आणि मुंड राक्षसांचा नाश केला. चंडचा नाश झाल्यानंतर मुंड युद्ध करताना या टेकडीमध्ये लपला आणि येथेच आईने त्याचा वध केला. मुंडेश्वरी भवानी मंदिराचे कोरीव काम आणि शिल्पे ही दगडाने बनवलेली असून अत्यंत आकर्षक मंदिर भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान आहे. मंदिरातील कोरीव काम आणि शिल्प उत्तरगुप्त काळातील आहेत. दगडाने बनवलेले हे अष्टकोनी मंदिर आहे. मंदिराच्या पूर्वेकडील भागात मुंडेश्वरी देवीची भव्य आणि प्राचीन दगडी मूर्ती आहे. माता देवी वाराहीच्या रूपात विराजमान आहे. देवीचे वाहन महिष (म्हैस) आहे. मंदिराला चार दरवाजे आहेत. त्यापैकी एक बंद आहे आणि एक अर्धा दरवाजा आहे. मंदिराच्या मध्यभागी पंचमुखी शिवलिंग स्थापित केले आहे. त्याचा दगड सूर्याच्या स्थितीनुसार रंग बदलतो. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला विशाल नंदीची मूर्ती आहे, जी अजूनही शाबूत आहे.
मंदिरात पशू बलिदानाची परंपरा आहे. ज्यामध्ये बकरी अर्पण केली जाते, परंतु कापली जात नाही. ही सात्त्विक त्यागाची परंपरा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अद्वितीय आहे. भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर बकऱयाचा बळी दिला जातो. परंतु माता रक्ताचा बळी घेत नाही, तर बळीच्या वेळी भक्तांमध्ये मातेबद्दल अद्भुत श्रद्धा निर्माण होते. जेव्हा बकरी मातेच्या मूर्तीसमोर आणली जाते, तेव्हा पुजारी अक्षत (तांदूळ) मूर्तीला स्पर्श करतो आणि तीच अक्षत बकरीवर फेकतो. बकरी लगेच बेशुद्ध पडते. जवळ जवळ मृत होते. काही वेळाने अक्षत फेकण्याची प्रक्रिया पुन्हा होते आणि बकरी उभी राहते. त्यागाच्या या कृतीमुळे आईवरील श्रद्धा वाढते. सध्या टेकडीवर असलेले हे मंदिर भग्नावस्थेत आहे. हे मंदिर कोणीतरी पाडल्याचे दिसते. धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे मूर्तींचे हात-पाय तुटले आहेत.
पंचमुखी महादेवाचे मंदिर जीर्ण अवस्थेत आहे. याच्या एका भागात देवीची मूर्ती दक्षिणाभिमुख उभी करून पूजा केली जाते. म्हशीवर स्वार होणारी मातेची साडेतीन फूट काळ्या पाषाणाची मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे. कनिंगहॅमने आपल्या पुस्तकातही या मंदिराचा उल्लेख केला आहे. पैमूरमध्ये मुंडेश्वरी टेकडी आहे. तिथे मंदिर उद्ध्वस्त अवस्थेत आहे, असा स्पष्ट उल्लेख त्यात आहे. टेकडीवर विखुरलेले दगड आणि खांब बघितले तर त्यावर श्रीयंत्रासारखी अनेक सिद्ध साधने व मंत्र कोरलेले आहेत. प्रत्येक कोपऱयात शिवलिंग आहे. टेकडीच्या पूर्व-उत्तर भागात माता मुंडेश्वरीचे मंदिर स्थापन झाले असावे व त्याभोवती विविध देवी-देवतांच्या मूर्ती स्थापित केल्या गेल्या असाव्यात. खंडित पुतळे टेकडीच्या वाटेवर ठेवलेले आहेत. या मंदिराच्या वाटेवर नाणीही सापडली असून टेकडीच्या दगडांवर तामीळ आणि सिंहली भाषेत काही अक्षरे कोरलेली आहेत. श्रीलंकेतूनही येथे भाविक येत असत, असे सांगितले जाते. सुरुवातीला फक्त टेकडीच्या खाली राहणारे लोकच या मंदिरात दिवे लावायचे आणि पूजा करायचे. सध्या या मंदिराचे आयोजन आणि पूजा धार्मिक विश्वस्त मंडळ, बिहारद्वारे केली जाते. माघ पंचमीपासून पौर्णिमेपर्यंत या टेकडीवर जत्रा भरते ज्यात दूरदूरवरून भाविक येतात. मंदिराचे पुरातन महत्त्व आणि वाढती श्रद्धा पाहून राज्य सरकार भाविकांच्या सोयीसाठी विश्रामगृह, रोपवे आदी बांधकाम करत आहे. डोंगरावर असलेल्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला असून त्यावरून छोटी वाहने थेट मंदिराच्या दरवाजापर्यंत जाऊ शकतात. मंदिरात जाण्यासाठी पायऱयांचाही वापर करता येतो.