स्वयंसिद्धा – सकारात्मक विचारांची सेवाव्रती

>> वर्षा चोपडे

समाजाला गरज असते विकास आणि विचारांची. अंधारलेल्या आयुष्यांना उजळ करत सकारात्मक विचारांचा वसा पुढे नेणाऱ्या, गेली 36 वर्षे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱया ज्योत्स्ना एकबोटे यांच्या कामाचा हा परिचय.

असे म्हणतात, स्त्री गृहलक्ष्मी असते; परंतु ध्येय, संस्कार उच्च कोटीचे असले आणि मानवता असली की ती स्त्राr सामाजिक जबाबदारीही त्याच जिद्दीने पार पडते आणि इतरांच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश पाडण्याचे काम करून तिच्यातील देवत्वाची साक्ष देते. प्रा. डॉ. ज्योत्स्ना गजानन एकबोटे ताईंचे अष्टपैलू आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व असेच मनाला भुरळ पाडते. तरुण पिढी हा देशाचा विकासाचा महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्या विकासासाठी कल्याणकारी योजना राबवण्यावर ताईंनी भर दिला. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात प्रगतशील धोरणांचा अवलंब, प्रत्येकाशी मिळून वागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे सर्वांशी सलोख्याचे संबंध, मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ताईंची ओळख आहे.

1990 नंतरच्या स्त्राrलिखित निवडक ललित गद्य साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर पीएच.डी. पदवी प्राप्त, शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक, प्रशासनात प्रमुख पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रात वर्षानुवर्षे उदार दातृत्व, राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक विकासाचे नेतृत्व असे भरघोस अनुभव आणि योगदान आहे. नवनवीन संकल्पनांचा आविष्कार, काळाशी जोडलेपण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून दूरदृष्टीने प्रत्येक गोष्टीचा ध्यास घेऊन ती पूर्णत्वाकडे जाईल याकडे ताईंचा कटाक्ष असतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांच्या अडचणीत सतत मदतीचा हात देणाऱया विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका अशी ओळख असणाऱया ज्योत्स्नाताई यांचे ‘स्वयंसिद्धा’ म्हणून कर्तृत्व-नेतृत्व वाखाणण्याजोगे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर त्या कार्यरत असून सर्वच क्षेत्रांत त्यांचा प्रभावी वावर आहे.

1934 साली स्थापलेली व शिक्षकांनीच चालवलेली संस्था अशी दृढ ओळख असलेल्या ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेच्या 15 वर्षांहून अधिक वर्षे सहसचिव म्हणून ज्योत्स्ना एकबोटे कार्यरत आहेत. विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक यांना जागतिक पातळीवर होणारे शैक्षणिक बदल, आधुनिक संशोधन, विविध संधी, आधुनिक जीवनातील आव्हाने आदींबद्दल माहिती मिळावी, जाणीव व्हावी या हेतूने मदत व्हावी म्हणून स्वतच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळा ताईंनी आयोजित केल्या आहेत. जवळपास 36 वर्षे फर्ग्युसन महाविद्यालयात प्राणिशास्त्र विषयाच्या प्रभावी प्राध्यापिका म्हणून कार्यरत असताना वेगवेगळे विभाग व समित्यांच्या प्रमुख पदावर प्रभावी कार्य केले आहे. त्यांच्या प्राणिशास्त्रावर लिहिलेल्या पुस्तकांचा समावेश अभ्यासक्रमातही करण्यात आलेला आहे. .

पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालय रोडवर कलाकार कट्टा निर्माण केला. महाराष्ट्रात आणि भारतात अशी संकल्पना पहिल्यांदाच साकार झाली. पुणे महानगरपालिकेच्या विकास निधीच्या माध्यमातून ‘एव्हिएशन गॅलरी’चे काम पूर्ण करून ‘सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी’ असणारी पुणे महानगरपालिका ही संपूर्ण देशातील पहिली महानगरपालिका म्हणून नावलौकिक प्राप्त करून देण्यात ताईंचा सहभाग आहे. हजारो विद्यार्थ्यांना एव्हिएशन क्षेत्रात येण्यासाठी स्फूर्ती या प्रकल्पातून मिळाली आहे. पुणे शहरातील महानगरपालिकेची पहिलीच स्वतंत्र ई-लायब्ररी व स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करण्यासाठी ‘मुद्रण महर्षी मामाराव दाते मुद्रणालय’ पाडून तेथे सर्व सुविधायुक्त मुद्रणालय उभारण्याचे काम सुरू केले आहे.

मुलांनी मोबाईलपासून दूर राहण्यासाठी बागांमध्ये ‘लिटल लायब्ररी’ची संकल्पना अतिशय दूरदृष्टीने मांडली, परिणामी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ‘लिटल लायब्ररी’ प्रथम सुरू करण्याचा मान मिळाला. मुलांसाठी ‘वॉटर बेल’ची अभिनव संकल्पना त्यांनी राबवली. भारतात केरळ राज्याने सुरू केलेल्या ‘वॉटर बेल’ उपक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्रात सर्वप्रथम पुणे शहरात महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये पाणी पिण्याची आठवण करणारी घंटा सुरू करण्याचा ठराव तातडीने मंजूर करून तसे आदेशही सर्व शाळांना दिले. उत्कृष्ट कामासाठी त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते त्यांना मानाचा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. ज्योत्स्नाताईंसारख्या काही व्यक्ती देशात धडाडीचे काम करून देशाला अधिक विकासाकडे नेत आहेत. त्यांचा विचार आणि कृती आपण पुढे नेली पाहिजे.

[email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल
सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)