पालघरमधील रेल्वे प्रवाशांचे होणार मेगा हाल, वलसाड फास्ट पॅसेंजर होणार सिंगल डेकर

डहाणूहून मुंबईला कामाला जाण्यासाठी चाकरमान्यांना फायदेशीर असणारी वलसाड फास्ट पॅसेंजर ही डबल डेकर ट्रेन बंद होणार आहे. ही पॅसेंजर आता सिंगल डेकर होणार असल्याने पालघरमधील रेल्वे प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने सिंगल डेकर करण्याचा निर्णय घेतला असल्याने नोकरदारवर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. ही सेवा कायम सुरू राहावी यासाठी आता प्रवाशांनी पुढाकार घेतला असून डबल डेकरसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे.

मुंबई सेंट्रल ते वलसाड या मार्गावर धावणारी फास्ट पॅसेंजर १९७५ च्या सुमारास सुरू केली गेली. सुरुवातीपासूनच या पॅसेंजरला डबल डेकरचे ११ डबे लावण्यात आले होते. यामुळे या ट्रेनची प्रवासी क्षमता मोठी होती. मात्र आता डबल डेकरचे डबे बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्यामुळे प्रवासी कमी बसणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल.

चेंगराचेंगरीची भीती 

मुंबईत दैनंदिन कामकाजासाठी जाणाऱ्या पासधारकांसाठी ही गाडी अत्यंत सोयीची आहे. उंबरगावपासून वैतरणा-विरारपर्यंतचे हजारो प्रवासी या गाडीने प्रवास करतात. या भागातील प्रवाशांसाठी वलसाड फास्ट पॅसेंजर ही लाईफलाईन ठरली आहे. १३६ आसन क्षमता असणाऱ्या डबल डेकर डब्यांमध्ये सर्वसाधारणपणे २५० ते ३०० प्रवासी सहज प्रवास करत असतात. त्या तुलनेत सिंगल डेकर डब्यांमध्ये १०२ ते १०८ आसन क्षमता आहे. त्यामुळे या डब्यांमध्ये चेंगराचेंगरीची भीती प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

भाजी, फळे, दूधविक्री करणाऱ्यांना सोयीचे 

काही महिन्यांपूर्वी फ्लाईंग राणी सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीला असणाऱ्या डबल डेकर डब्याऐवजी सिंगल डेकर डब्यांची जोडणी केली होती. त्यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींना व त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच डबल डेकर डब्यांचे रुंद दरवाजे असल्याने भाजी, फळ, दूधविक्री करणाऱ्यांना सामान ठेवणे सोयीचे ठरते.

बोरिवली-दादर या ठिकाणी भाजीपाला घेऊन जाण्यासाठी वलसाड एक्स्प्रेस ही उपयुक्त गाडी आहे. डबल डेकरमध्ये दरवाज्यात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्यामुळे आम्हाला आमचे विक्रीचे सामान ठेवण्याची चिंता भेडसावत नव्हती. मात्र भविष्यात आता भाजी, फळ, दूधविक्री करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

 ■ राजेश पाटील, भाजीपाला व्यापारी

वीस वषाँची असते. त्यांचे आयुष्य संपत आले आहे. त्यामुळे ते बदलण्यात येणार आहेत. डबे बदलण्याचे नक्की झाले आहे. मात्र ते कधी बदलण्यात येतील याची तारीख अजून ठरली नाही. प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल.

■ विनित अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे