वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती! निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा आरोप

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर आपल्याला होती, असा खळबळजनक गौप्यस्पह्ट निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत कासले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी यापूर्वीही आरोपांची राळ उडवली होती. आताही त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात त्यांनी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरच्या सुपारीची ऑफर आपल्याला मिळाली होती, असा गौप्यस्पह्ट केला आहे. मात्र माझ्याकडून हे पाप होणार नाही, असे स्पष्ट सांगून ही ऑफर आपण नाकारली होती, असे कासले यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. एन्काऊंटर करण्यासाठी तुम्ही फक्त रक्कम सांगण्याचा अवकाश आहे. 10 कोटी ते 50 कोटींपर्यंत ऑफर असते. मी सायबर क्राईमला होतो. मी एन्काऊंटर करू शकतो हे त्यांना माहिती होते, असेही कासले या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.