कराड आणि घुलेवर ‘बीड’ कारागृहात हल्ला, गितेसह चौघांची रवानगी हर्सूलमध्ये

संतोष देशमुख हत्याकांडातील सहा आरोपी असणाऱ्या कैद्यांचे बीडच्या कारागृहात आज सोमवारी सकाळी तुफान टोळीयुद्ध झाले. परळीच्या बापू आंधळे खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या महादेव गिते याने ‘आका’ वाल्मीक कराडच्या कानशिलात लगावून सुदर्शन घुले यालाही चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी महादेव गिते टोळीतील चौघांना तातडीने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हर्सूलच्या कारागृहात हलवले आहे.

बीडच्या कारागृहात संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह सहा जण आहेत. त्याच कारागृहात परळी येथील बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपीदेखील आहेत. बापू आंधळे खून प्रकरणात वाल्मीक कराड याने गोवल्याचा आरोप महादेव गिते याने केला होता. बापू आंधळे खून प्रकरणात राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष बबन गिते याचे नाव गोवण्यात आल्याचा आरोपही होत आहे. अनेक दिवसांपासून बबन गिते फरार असून महादेव गिते बीड कारागृहात आहे.

मारहाण झाली नाही ः कारागृह अधीक्षक

सोमवारी सकाळी सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे नातेवाईकांना दूरध्वनी करण्यासाठी आले असता त्यांच्यात झटापट सुरू झाली. कर्मचारी वाद मिटवित असताना इतर कैदी धावले व शिवीगाळ करू लागले. तुरुंग प्रशासनाने कैद्यांना बराकींमध्ये बंदिस्त करून शिवाजीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावेळी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाली नसल्याचा खुलासा बीड जिल्हा कारागृह नं.2 अधीक्षक बी.एन. मुलानी यांनी केला आहे.

बबनच्या पोस्टमधून वाल्मीकला इशारा

परळीत वाल्मीक कराड आणि बबन गिते यांच्यात हाडवैर आहे. दोघांनीही एकमेकांना संपवण्याची शपथ घेतलेली आहे. बबन गितेला संपवणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी शपथ वाल्मीक कराडने, तर वाल्मीकला संपवल्याशिवाय केस कापणार नाही, अशी शपथ बबन गितेने घेतली होती. या वैरातूनच वाल्मीकने परळीतील खून प्रकरणात गोवल्याचा आरोप बबनने केला होता. त्याच प्रकरणात बबन नऊ महिन्यांपासून फरार आहे. मात्र आज वाल्मीकला मारहाण झाल्यानंतर सोशल मीडियावरून बबन गिते याने ‘अंदर मारना या मरना सब कुछ माफ है’ अशी पोस्ट व्हायरल करून वाल्मीकला इशारा दिला आहे.

‘आका’च्या कानशिलात वाजवली

आज सकाळी वाल्मीक कराड आणि गिते समोरासमोर येताच दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यातून जोरदार हाणामारी झाली. यात महादेव गिते याने वाल्मीक कराडच्या कानशिलात लगावली, तर सुदर्शन घुले यालाही चोप दिल्याचे सूत्रांनी सांगितले. कारागृह प्रशासनाने हस्तक्षेप करून टोळीयुद्ध नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, टोळीयुद्धाचे वृत्त तुरुंग प्रशासनाने फेटाळले असून, विशेष कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी मारहाण झाली नसल्याचे म्हटले आहे. वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली, असा आरोप करून कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी गिते याने केली आहे.

वाद नव्हे, टोळीयुद्धच

हे टोळीयुद्ध आहे. वाल्मीक कराड विरुद्ध बबन गिते यांचा वाद जिह्याला परिचित आहे. या वादातूनच कराड आणि घुलेला मारहाण झाली, असे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले. कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे. त्याच्याकडे मोबाईलही आहे, असे ते म्हणाले.

खून करून घेतला भावाच्या आत्महत्येचा बदला

भावाने ज्याच्या दहशतीखाली ज्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली, त्याच झाडाखाली दहशत माजवणाऱ्याचा दगडाने ठेचून खून करून भावाच्या आत्महत्येचा बदला घेतल्याची भयंकर घटना बीड जिह्यातील कान्हापूर येथे घडली. हत्या केल्यानंतर आरोपी दाम्पत्य पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले. धारूर तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याजवळील कान्हापूर येथे ही घटना घडली असून, स्वप्नील ऊर्फ बबलू देशमुख असे मयताचे नाव आहे.