जागतिक ब्लिट्जमध्ये वैशालीला कांस्यपदक

हिंदुस्थानची महिला बुद्धिबळपटू आर. वैशाली हिने जागतिक ब्लिट्ज अजिंक्यपद स्पर्धेतील महिला गटात कांस्यपदकाची कमाई केली. कोनेरू हम्पीने जलदगती स्पर्धेचे जगज्जेतेपद जिंकल्यानंतर वैशालीने ब्लिट्ज प्रकारात देशाचा तिरंगा फडकविला.

वैशालीने उपांत्यपूर्व लढतीत चीनच्या झू जिनर हिचा 2.5-1.5 असा पराभव केला, मात्र त्यानंतर उपांत्य लढतीत तिला चीनच्याच जू वेनजुन हिच्याकडून 0.5-2.5 अशी हार पत्करावी लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत चिनी खेळाडूंचा दबदबा बघायला मिळाला. जू वेनजुन हिने आपलीच देशसहकारी लेई टिंगजी हिचा 3.5-2.5 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. पाच वेळेचे जगज्जेते आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) उपाध्यक्ष असलेल्या विश्वनाथन आनंद यांनी वैशालीचे आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर अभिनंदन केले.

कार्लसन-नेपोम्नियाचची संयुक्त पुरस्कार

जागतिक ब्लिट्ज अजिंक्यपद स्पर्धेतील खुल्या गटात अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसन व रशियाचा इयान नेपोम्नियाचची यांनी अखेर किताब विभागून घेतला. कारण सडन डेथमधील तीनही डावांनंतर कोणालाच स्पष्टपणे विजेतेपदाला गवसणी न घालता आल्याने त्यांनी किताब विभागून घेण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेच्या इतिहासात प्रथम अशी किताबाची विभागणी झाली हे विशेष!