इंडियन प्रीमियर लीग 2025 चा लिलाव सोमवारी पार पडला. या लिलावामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना कोट्यवधींची बोली लागली, तर काही खेळाडू अनसोल्ड राहिले. यात सर्वाधिक लक्ष वेधले ते 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने. राजस्थान रॉयल्स संघाने 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले. यानंतर वैभवच्या वडिलांनी त्याला क्रिकेटपटू बनवण्यासाठी किती कष्ट घेतले याची माहिती दिली.
वैभव सूर्यवंशी याला लिलावात कोट्यवधींची बोली लागल्याचे पाहून त्याचे वडील संजीव सूर्यवंशी भावूक झाले. वैभवचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण शेतीही विकल्याचे त्यांनी सांगितले. वैभव 10 वर्षाचा असताना त्यांनी शेती विकली होती. मात्र अवघ्या तीन वर्षातच वैभवने इतिहास रचत आपल्यासोबत वडिलांचे नावही गाजवले. आयपीएल लिलावात वैभवला राजस्थानने खरेदी केले. त्याचे वय 13 वर्ष 8 महिने असून सर्वात कमी वयात आयपीएलसाठी बोली लागणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.
संजीव सूर्यवंशी यांची बिहारच्या समस्तीपूर शहरापासून 15 किलोमीटर दूर आपल्या वडिलोपार्जीत मोतीपूर या गावात शेतजमीन आहे. वैभव 8 वर्षाचा होता तेव्हा त्याने अंडर-16 डिस्ट्रिक्ट ट्रायलमध्ये दमदार कामगिरी केली. त्यावेळी संजीव सूर्यवंशी त्याला कोचिंगसाठी समस्तीपूरला घेऊन जायचे. त्यानंतर पाटणातील जीएस अकादमीमध्ये मनीष ओझाकडे त्याचा सराव सुरू झाला.
भुवनेश्वर, दीपक चहरचा भाव वाढला; दुसऱया दिवशी आयपीएल लिलावात सर्वाधिक किंमत
…तर टेस्टसाठी तयार
दरम्यान, वैभव सूर्यवंशी याचे वय 15च्या आसपास असावे असा आरोप होत आहे. यावरही त्याच्या वडिलांनी भाष्य केले. तो 8 वर्षाचा होता तेव्हा त्याने पहिल्यांदा बीसीसाआय बोन टेस्ट दिली होती. तो अंडर-19 स्पर्धाही खेळलेला आहे. आम्हाला कशाचीही भीती नाही. तो पुन्हा एज टेस्ट करायलाही तयार आहे, असे संजीव सूर्यवंशी म्हणाले.
बोलीसाठी दोन संघ भिडले
दरम्यान, आयपीएलचा मेगा लिलाव सौदीमध्ये झाला. वैभव सूर्यवंशी याची बेस प्राईज 30 लाख रुपये होती. त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात वॉर सुरू झाले. अखेर बोली वाढत गेली आणि दिल्लीने हार मानली. राजस्थानने 1.10 कोटी मोजून त्याला आपल्या संघात घेतले.
कुटुंबाने केलं सेलीब्रेशन
आयपीएल लिलावात सहभागी होणारा वैभव सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला असून सध्या त्याचे वय 13 वर्ष 244 दिवस एवढे आहे. बिहारसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या वैभवने याच वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला आता आयपीएलमध्ये कोट्यवधींची बोली लागल्यानंतर घरच्यांनी केक कापून सेलिब्रेशन केले.