वडवळ-नागनाथ येथून जाणाऱ्या (NH 752 के) महामार्गाच्या रस्त्याचे काम जुन्या गावं नकाशा प्रमाणे करण्यात यावे, यासाठी वडवळ ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी गाव बंद आणि काम बंद आंदोलन करण्यात आले. या आवाहनाला व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे पाठिंबा देत पूर्ण बाजारपेठ बंद ठेवली. तसेच रस्त्याचे वडवळ हद्दीतील काम बंद आंदोलन करण्यात आले.
कोपरा ते घारोळा (NH 752 के) महामार्गाचे सध्या सुरू असून काम अंतिम टप्प्यात आले आहे. या रस्त्याचे काम करत असताना वडवळ नागनाथ गावांसह शिवारात रस्त्याची रुंदी तसेच रस्त्यांवर असलेल्या पुलांची रुंदी कुठे कमी, कुठे अधिक प्रमाणात करण्यात येत असल्याने भविष्यात यांचा नाहक त्रास होणार आहे. वाहन धारकांसह नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेत ग्रामस्थांनी मागील आठवड्यात विशेष ग्रामसभा घेत होणारा रस्ता जुन्या गाव नकाशा नोंदी प्रमाणे रुंदीचा करावा; असा ठराव सर्वानुमते घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ठराव आणि शेकडो स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले होते. मात्र यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतेच पाऊल उचलले नाही. उलट आपले काम अंतिम टप्प्यात असताना काम उरकण्याचा सपाटा लावला असल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी गाव बंद आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
वडवळ येथे तीर्थक्षेत्र असलेले “वटसिद्ध नागनाथ” मंदिर आणि देशभर दुर्मिळ वनौषधीसाठी प्रसिद्ध असलेले “संजीवनी बेट” असल्याने येथे भाविक आणि पर्यटक गर्दी करतात. तसेच वडवळ नागनाथ हे महसूल मंडळाचे गावं असल्याने येथे विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. यात सात शाळा, एक कॉलेज, यांसह विविध बँका, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस, विज उपकेंद्र, पतसंस्था इत्यादी मुख्य कार्यालय येथेच असल्याने परिसरातीलही नागरिकांची वर्दळ असते. येथील शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेण्यात अग्रेसर आहेत. यामुळे टोमॅटोसह भाजीपाल्याची, कृषी दुकानांची मोठी बाजारपेठ असल्याने मोठ्या वाहनांची गर्दी होऊन वाहतूकीची कोंडी नेहमीचच होते. त्यामुळे या रस्त्याचे काम हे जुन्या गाव नकाशा प्रमाणे नोंदी पाहून रुंदीचे करून वडवळ नागनाथ येथे “शिवाजी चौक, बसवेश्वर चौक ते रेल्वे स्थानक” दरम्यानचा रस्ता रुंद करावा, या मागणीसाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने आणि व्यापाऱ्यांच्या वतीने बाजारपेठ बंद ठेवत आंदोलन करण्यात आले.
ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा
प्राथमिक स्वरूपात ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसीय बाजारपेठ, गाव बंद करून 752के रस्ता गावं नकाशा प्रमाणे करण्यात यावा, यासाठी शनिवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकारी यांनी लक्ष देत रस्ता रुंदीकरण करावे, अन्यथा समस्त वडवळ ग्रामस्थांच्या वतीने लातूर – नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.