पालिका रुग्णालयांतील रिक्त पदे दोन महिन्यांत भरणार, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश  

मुंबईतील पालिकेची प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांतील असंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून त्यातून गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे. रिक्त पदांमुळे रुग्णालयातील कामाचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर आज पुन्हा म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची दालनात भेट घेतली. या वेळी येत्या दोन महिन्यांत ही रिक्त पदे भरण्यात येतील, असे आश्वासन पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

मुंबईत असलेल्या पालिकेच्या मुख्य आणि उपनगरीय रुग्णालयांवर लाखो सर्वसामान्य लोक आरोग्य सुविधांसाठी अवलंबून आहेत. मात्र रुग्णालयांतील रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना योग्यरित्या आरोग्य सुविधा पुरवण्यात असमर्थता येते, ही बाब शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त शर्मा यांच्या निदर्शनाला आणून दिली. युनियनने उपस्थित केलेल्या रिक्त पदांबाबत आढावा घेऊन पदभरती करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश शिष्टमंडळासोबत उपस्थित असलेले उपायुक्त संजय कुऱहाडे यांना देण्यात आले. दरम्यान, रुग्णालयातील रिक्त जागा भरण्यासह इतर प्रश्नांसाठी लवकरच संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन विपीन शर्मा यांनी शिष्टमंडळाला दिले. या वेळी सरचिटणीस सत्यवान जावकर, उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर, रंजना नेवाळकर, चिटणीस हेमंत कदम, संजय वाघ, वृषाली परुळेकर, अजय राऊत, अतुल केरकर, महेश गुरव, संदीप तांबे, रामचंद्र लिंबारे उपस्थित होते.

तूर्त आंदोलन स्थगित 

मुख्य आणि उपनगरातील रुग्णालयांतील रिक्त जागांवरील भरती आणि इतर प्रश्नांबाबत 29 जानेवारीला युनियनने जाहीर केलेले रुग्णालयातील निदर्शने आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिली.