महाकुंभमेळय़ात भक्तीचा महापूर लोटला आहे. त्यात चेंगरीचेंगरीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली गेली आहेत. मुख्य म्हणजे प्रयागराजबरोबरच वाराणसी आणि अयोध्येतही भाविकांची गर्दी उसळू लागली असून ही बाब लक्षात घेऊन वाराणसीच्या घाटांवर गंगाआरतीसाठी तूर्त भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत भाविकांना गंगा आरतीत प्रवेश नसेल. वाराणसीकरांनीही कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले.
वाराणसी स्टेशनवर प्रचंड गर्दी
प्रयागराज येथून कुंभमेळ्यातून परतलेले हजारो भाविक सध्या वाराणसी आणि छावणी रेल्वे स्टेशनवर अडकले आहेत. रेल्वे गाडय़ांना प्रचंड गर्दी असल्याने भाविकांची काsंडी झाली आहे. त्यात काही ट्रेन रद्द करण्यात आल्याने गोंधळाची स्थिती आहे.
चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना मोक्षप्राप्ती – धीरेंद्र शास्त्री
महाकुंभमेळय़ात चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. खरंतर ते मरण पावलेले नाहीत तर त्यांना मोक्षप्राप्ती मिळाली आहे, असे विधान बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्राr यांनी केले. जी घटना घडली ती निश्चितच दुःखद, हृदयद्रावक आणि अकल्पनीय आहे, असे नमूद करत ते म्हणाले, ‘घटना घडल्यानंतर एका कम्युनिस्ट मित्राचा फोन आला. इतके साधूसंत असूनही हे कसे घडले, असे त्याने विचारले. त्यावर देशात दररोज कोटय़वधी लोक मरतात. काही औषधांविना तर काही आरोग्य व्यवस्थेचे बळी ठरतात. तरीही जे घडले ते वाईटच आहे. पण एक लक्षात घ्या, हा महाप्रयाग आहे. मृत्यू सर्वांनाच अटळ आहे. त्यामुळे कुणाला गंगेच्या काठी मरण येणार असेल तर त्याला मरण म्हणू नका तर मोक्षप्राप्ती म्हणा.’