
अतिवेगामुळे कार अनियंत्रित होऊन अकलनंदा नदीत कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी उत्तराखंडमध्ये घडली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. एका महिलेला वाचवण्यास यश आले आहे. टिहरी जिल्ह्यातील देवप्रयाग येथे ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
मयत पाचही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळते. अपघातग्रस्त एसयूव्ही कारमधून सहा जण देवप्रयाग येथील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत होते. यावेळी कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर कार रस्त्यावर उलटून अलकनंदा नदीत कोसळली.
स्थानिकांनी एसडीआरएफला अपघाताची माहिती दिली. एसडीआरएफने तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील महिलेची सुखरुप सुटका केली. यानंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पाचही मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. क्रेनच्या सहाय्याने कारही बाहेर काढण्यात आली आहे. पोलीस अपघाताबाबत सखोल तपास करत आहेत.