जनआक्रोशापुढे भाजप सरकारला झुकावंच लागलं; वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांचा अखेर राजीनामा, अश्रू अनावर

जनआक्रोशापुढे अखेर उत्तराखंडमधील भाजप सरकारला झुकावे लागले असून अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल यांना राजीनामा द्यावा लागला आहे. रविवार दुपारी यमुना कॉलनीतील सरकारी निवासस्थानामध्ये पत्रकार परिषद घेत प्रेमचंद अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

उत्तराखंड विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी प्रेमचंद अग्रवाल आणि विरोधी आमदारांमध्ये शा‍ब्दिक चकमक उडाली होती. यावेळी अग्रवाल यांनी हे राज्य डोंगराळ (पहाडी) लोकांसाठीच बनवलं आहे का? असा सवाल केला होता. त्यांच्या या विधानावरून सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला होता.

विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रेमचंद यांच्या माफीची मागणी केली होती. त्यानंतर राज्यभरातील जनताही रस्त्यावर उतरली आणि त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाले. विशेष म्हणजे विरोधकांसह भाजपच्या अनेक नेत्यांनीही त्यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता. अखेर रविवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याकडे सोपवला.

राजीनामा देताना काय म्हणाले प्रेमचंद अग्रवाल?

माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून मला टार्गेट करण्यात आले, असे प्रेमचंद अग्रवाल म्हणाले. मी राष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडू असून उत्तराखंड वेगळे राज्य व्हावे म्हणून 1994 पासून मी आंदोलन केले. माझ्यावर रासुका लावण्याचाही प्रयत्न झाला. मी नेहमी राज्यासाठी लढत राहिलो. त्यानंतरही माझ्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले, असे म्हणत प्रेमचंद अग्रवाल भावूक झाले.

लाठीचार्जही सहन केला

मुजफ्फरनगरची घटना घडली तेव्हा मी दिल्लीत होतो. ती घटना बघून मला अस्वस्थ वाटल्याने मी ट्रकमध्ये बसून तिथे पोहोचले. तिथे जे पाहिले त्याचे वर्णनही करता येणार नाही. उत्तराखंडसाठी मी लाठ्या, काठ्या खाल्ल्या, असेही ते म्हणाले.