Uttarakhand bus accident – पर्यटकांची बस खोल दरीत कोसळली, 23 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. मार्चुलाजवळ पर्यटकांची बस खोल दरीमध्ये कोसळली. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. उंचावरून कोसळल्याने बसचा चेंदामेंदा झाला असून या अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातग्रस्त बसमध्ये जवळपास 40 प्रवासी होते. ही बस नैनी डांडामधील किनाथ येथून रामनगरकडे निघाली होती. मात्र अल्मोडा जिल्ह्यातील मार्चुला भागात बस दरीमध्ये कोसळली. गीत जागीर नदीजवळ हा अपघात झाला असून बसचा पार चेंदामेंदा झाला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरफ आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. आतापर्यंत 23 जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

अल्मोडातील पोलीस मुख्यालयाचे प्रवक्ते पोलीस महानिरीक्षक निलेश आनंद भरणे यांनी माध्यमांशी बोलताना या अपघातात 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या बसमधून 45 जण प्रवास करत होते. अपघातातील जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.