उत्तराखंड सहस्त्रतळ येथे ट्रेकिंगला गेलेल्या नऊ गिर्यारोहकांचा मृत्यू

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे असलेल्या सहस्त्रतळ या 15 हजार फूट उंचीवर असलेल्या शिखऱावर ट्रेकिंगला गेलेल्या 9 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे या गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. या ग्रृपमधील तेरा जणांची हवाईदलाने सुखरूप सुटका केली आहे.

22 गिर्यारोहकांचा एक ग्रृप 4 जून रोजी सहस्त्रतळ येथील एका तलावाजवळ पोहोचले. या 22 पैकी 18 कर्नाटकातील तर एक महाराष्ट्रातील होता. त्यांच्यासोबत तीन स्थानिक शेर्पा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेले होते. मात्र योग्य नियोजन व मार्गदर्शन नसल्यामुळे ते खराब हवामानात हरवल्याचे समोर आले. त्यानंतर बेस कॅम्पचा त्यांच्याशी संपर्क तुटल्यानंतर हवाई दलाच्या मदतीने या गिर्यारोहकांचा शोध सुरू करण्यात आला. शोधकार्यादरम्यान जवांनानी 13 जणांची सुटका केली तर पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. चार जणांच्या मृतदेहांचा शोध सुरू असल्याचे हवाईदलाने सांगितले.

आशा (71), सिंधू (45), सुजाता (51), चित्रा परिणित (48) आणि विनायक (54) अशी मृत्यूमुखी पडलेल्या पाच गिर्यारोहकांची नावं आहेत.