उत्तर प्रदेशात महिला रिक्षाचालकावर सामूहिक बलात्कार, लष्करातील जवान असल्याचे भासवून रचला कट

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे लष्करातील जवान असल्याचे भासवून दोघांनी 36 वर्षीय महिला रिक्षाचालकावर सामूहिक बलात्कार केला. मुलीला लष्करी शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी पीडितेला दिले आणि कट रचला. आरोपी सध्या फरार असून त्यांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला, असा आरोप पीडितेने केला.

पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले की, दोन जण रिक्षामध्ये चढले असता प्रवासादरम्यान त्यांनी स्वतःला लष्करातील जवान असल्याचे सांगितले. मुलीची मदत करतो असे सांगून फोन नंबरची देवाणघेवाण केली. त्यानंतर त्यांनी तिला एका हॉटेलचा पत्ता दिला. ती हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांनी तिला एका खोलीत नेले आणि बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांना काही सांगितल्यास मुलीला मारण्याची धमकी दिली.

आरोपी बुलंदशहरचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तपासाचा भाग म्हणून एक पथक पाठवण्यात आले आहे. महिलेच्या वैद्यकीय अहवालातून काही पुरावे मिळाले असून रकाबगंज पोलीस ठाण्यात महिलेने केलेल्या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध कलम 70 (1) अंतर्गत सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.