उत्तर प्रदेशातील संभल येथे मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारात गोळ्या लागून ठार झालेल्यांचा आकडा 4 वर गेला आहे. शवविच्छेदन अहवालात गोळी देशी बनावटीच्या पिस्तुलातून चालवण्यात आल्याचे समोर आल्याचा दावा मुराबादचे आयुक्त अंजनेय कुमार यांनी केला आहे. या चारही मृत्यूंची दंडाधिकारी चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी शाही जामा मशिदीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडण्यात आली. हिंसाचाराचा मुद्दा शांत होत होता. परंतु, सीओने मशिदीच्या टाकीतून पाणी काढल्याचे सांगितले. हे पाणी मशिदीतून बाहेर पडताच बघ्यांची गर्दी जमली. मी सीओंना याबाबतच विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ केली आणि लाठीमार केला. जास्त प्रश्न विचारले तर जड जाईल, अशी धमकी दिली, असे शाही जामा मशिदीचे सदर जफर अली यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे संभलमध्ये पुन्हा तणाव वाढला असून पोलिसांचा फौजफाटा आणखी वाढवण्यात आला आहे.
सपा खासदाराविरोधात हिंसा भडकावल्याचा गुन्हा
पोलिसांनी सपा खासदार झियाउर रहमान बर्के आणि आमदार नवाब इक्बाल महमूद यांचा मुलगा सुहेल इक्बाल यांच्याविरोधात हिंसा भडकावल्याबद्दल एफआयआर नोंदवला आहे. त्यानंतर देशभरात मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप बुर्के यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी हिंसाचाराशी संबंधित 7 एफआयआर नोंदवले असून यात 6 जणांची नावे आहेत तर 25000 हून अधिक अज्ञातांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत याप्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या चारही तरुणांवर पोस्टमॉर्टमनंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सत्तेचा वापर – राहुल गांधी
हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि भेदभाव निर्माण करण्यासाठीच भाजप सत्तेचा वापर करत आहे. अशाप्रकारे सत्तेचा वापर राज्याच्या किंवा देशाच्या हिताचा नाही. त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी विनंती मी सर्वोच्च न्यायालयाला करतो, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संभल हिंसाचार प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. संभलबाबत योगी सरकारची पक्षपाती आणि उतावीळ वृत्ती अत्यंत दुर्दैवी आहे. हिंसाचार आणि गोळीबारात ज्यांनी आपल्या नातेवाईकांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना. प्रशासनाने सर्व पक्षांचे म्हणणे न ऐकता आणि असंवेदनशीलता बाळगत केलेल्या कारवाईमुळे वातावरण आणखी चिघळले असून यासाठी भाजप सरकारच थेट जाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.