![Mahakumbh rush](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Mahakumbh-rush-696x447.jpg)
वसंत पंचमी स्नानानंतर प्रयागराजमध्ये भाविकांचा अक्षरशः महासागर उसळला असून गेल्या 48 तासांपासून लाखो भाविक वाहनांमध्ये अडकून पडल्याचे चित्र आहे. रस्ते जाम असल्याने हजारो भाविकांनी रेल्वे स्थानकांकडे धाव घेतल्याने स्थानकांवर भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र आहे, तर प्रयागराजपासून वाराणसी, मिर्झापूर, लखनऊ आणि रेवा महामार्गावर 20 किलोमीटरपर्यंत व मध्य प्रदेशातील जबलपूर ते प्रयागराजपर्यंत 350 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, गुजरातमधील भाविकांची काsंडी
वाराणसी, लखनऊ आणि कानपूर ते प्रयागराज या मार्गावर 25 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. लाखो वाहनांमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात या राज्यांमधील लाखो भाविक अडकून पडले आहेत. संगमतटावर जाऊन पवित्र स्नान करण्याकडे भाविकांचा ओढा आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाल्याचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त कुलदीप सिंह यांनी सांगितले.