यूपीपीएससी अर्थात उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी योगी सरकारविरोधात आज प्रचंड आक्रमक झालेले दिसले. आरओ-एआरओ आणि पीसीएस प्राथमिक परीक्षा वेगवेगळ्या तारखांना घेण्याच्या यूपीपीएससीच्या निर्णयाला परीक्षार्थींचा कडाडून विरोध असून परीक्षा एकाच दिवसात आणि एकाच वेळी घेण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी आज हजारो परीक्षार्थींनी यूपीपीएससीच्या मुख्यालयाला घेराव घातला. परीक्षार्थींचा रुद्रावतार पाहून मोठय़ा प्रमाणावर फौजफाटा बोलावण्यात आला. यात आंदोलक परीक्षार्थींची पोलिसांसोबत झटापट झाली.
पोलिसांनी परीक्षार्थींना गेट क्रमांक 2 पर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे परीक्षार्थी आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी आयोगाविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्सही उभारले होते. परंतु, हे बॅरिकेड्स तोडून परीक्षार्थींनी मुख्यालयाला घेरले. यात त्यांची पोलिसांशी झटापट झाली. यूपीपीएससीने आरओ म्हणजेच रिह्यू ऑफिसर आणि एआरओ म्हणजेच असिस्टंट रिह्यू ऑफिसर या पदांसाठीच्या प्राथमिक परीक्षा दोन पाळ्यांमध्ये 7 आणि 8 डिसेंबर रोजी होतील, अशी घोषणा केली होती.
भाजपप्रणित सरकार विद्यार्थीविरोधी– अखिलेश यादव
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध केला असून भाजपा सरकार हे युवाविरोधी आणि विद्यार्थीविरोधी असल्याचा आरोप केला आहे. यूपीपीएससी परीक्षांमधील हेराफेरी थांबवण्याची मागणी परीक्षार्थींची आहे. परंतु, भ्रष्टाचारी भाजप सरकार उलटे आक्रमक झाले आहे, असे यादव यांनी म्हटले आहे.भाजपा प्रणित सरकारला तरुणांना नोकऱया द्यायच्या नाहीत, त्यांच्या अजेंडय़ावर हा मुद्दाच नाही. परीक्षार्थी आणि विद्यार्थी अत्यंत शांततेत आंदोलन करत आहेत. परंतु, हुकूमशहा योगी सरकारने त्यांचा हा अधिकारही काढून घेतल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला आहे. आंदोलक तरुणींवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा दावाही यादव यांनी केला आहे.