आम्ही महाराष्ट्रातून आलोय… मरता मरता वाचलो, योगींनी लोकांना मरण्यासाठी येथे बोलावले का? चेंगराचेंगरीत वाचलेल्या लोकांचा आक्रोश

चेंगराचेंगरी झाली, पण तिथे अर्धा तास पोलीसच नव्हते. मरता मरता वाचलो. आम्ही महाराष्ट्रातून आलोय. आमचे पैसे गेले, कपडे गेले. आता घरी कसे जाणार? योगी आदित्यनाथ यांनी लोकांना मरण्यासाठी येथे बोलावले का? ही व्हीआयपी व्यवस्था आहे का, असा सवाल करीत लोकांनी आक्रोश व्यक्त केला.

हे कसले योगी?

इथे काहीही व्यवस्था, प्रशासन नाही. मुख्यमंत्री योगी आहेत म्हणे? हे कसले योगी. मेले तर मेले भाविक अशी स्थिती आहे. कसली व्हीआयपी व्यवस्था, असा संतापही भाविकांनी व्यक्त केला.

मी भाजप संघाच्या विचारसरणीची, पण…

मी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची आहे, पण येथे व्यवस्था नाही. मरता मरता वाचले, असे महाराष्ट्रातील एका महिलेने सांगितले.
प्रयागराजच्या महाकुंभमध्ये संगम घाटावरील अतिशय भीषण दृश्य होते. काहीजण आई-वडील, भाऊ-बहीण, नातलग, मित्रांना शोधत होते. अनेक भाविकांचे पैसे हरवले, घाटावर कपडे, पिशव्या, चपलांचे ढिगारे पडले होते. अनेक भाविक मदत मागत होते. भाविकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर संताप व्यक्त केला.

पवित्र स्नानासाठी संगम घाटावर आलेल्या महाराष्ट्रातील काही भाविकांना आपल्यावर बेतलेल्या भयंकर घटना सांगितल्या. त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ‘आम्ही महाराष्ट्रातून आलोय. माझ्यावर दोनशे लोकांचा लोंढा पडला. कसेबसे मरता मरता आम्ही वाचलो. कपडे गेले, पैसे गेले. आता घरी कसे जाणार? माझ्या आईच्या अंगावरील कपडे गेले. मदतीला कोणी पोलीस आले नाहीत. उलट तसेच जा असे पोलीस सांगत होते,’ असे महाराष्ट्रातील एका कुटुंबाने सांगितले.

पोलीस उपमहानिरीक्षकांनी खापर भाविकांवर फोडले

महाकुंभातील ढिसाळ प्रशासन आणि अपुऱ्या यंत्रणेमुळे भयंकर चेंगराचेंगरी होऊन 30 वर भाविकांचा मृत्यू झाला. मात्र उत्तर प्रदेशचे पोलीस प्रशासन भाविकांवरच खापर फोडत आहे. महाकुंभचे पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्ण यांनी भाविक ब्रह्ममुहूर्ताची वाट पाहत होते. अचानक गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली असे सांगितले. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर तब्बल 18 तासांनी उत्तर प्रदेश सरकारने मृतांचा आकडा जाहीर केला. 30 भाविकांचा मृत्यू आणि 60 भाविक जखमी झाल्याचे डीआयजी वैभव कृष्ण यांनी सांगितले, मात्र चेंगराचेंगरीला अप्रत्यक्षपणे त्यांनी भाविकांना जबाबदार धरले आहे. महाकुंभमध्ये ब्राह्ममुहूर्तावर स्नान करणे पवित्र मानले जाते. भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते. भाविकांची गर्दी अचानक वाढली. काहीही कल्पना नसताना गर्दी वाढल्याने हलकल्लोळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली, असे वैभव कृष्ण यांनी सांगितले.

महाकुंभात पुण्यात्मा गमावले – नरेंद्र मोदी

‘महाकुंभात झालेल्या चेंगचेंगरीत आपण काही पुण्यात्मा गमावले. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृत भाविकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर गंभीर जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्थानिक प्रशासन पीडितांना लागेल ती मदत करत आहे. याप्रकरणी मी सातत्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संपका&त असून तेथील स्थितीचा आढावा घेत असल्याचे पंतप्रधान यांनी म्हटले आहे.

पुण्य कमावले नाही तरी चालेल, पण जीव वाचवा

किशोरी नावाच्या एका सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरने चेंगराचेंगरीच्या ठिकाणाहून अनेक भयावह दृश्ये शेअर केली. लोक मरणाच्या दारातून येऊन ठेपलेत, असे ती सांगताना दिसत आहे. अमृतस्नानादरम्यानचाही व्हिडीओ तिने शेअर केला. ‘आज मौनी अमावास्येचे पवित्र स्नान आहे. इथली परिस्थिती खूपच भयंकर झाली आहे. प्रत्येक जण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडतोय. कुणीच कुणाची मदत करत नाही. मी तुम्हाला विनंती करते कृपया येथे येऊ नका, असे सांगताना किशोरी दिसत आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाखांची मदत

या दुर्घटनेने अतीव दुःख झाले. सर्व मृतांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना असून न्यायिक आयोग याप्रकरणी चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची भरपाई देण्याचीही घोषणा केली. दरम्यान, संगमतटावर तब्बल दहा कोटींहून अधिक भाविक आल्याने चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

तीर्थक्षेत्रावर मृत्यू होतो ते देवाचरणी जातात

लोकांनी शिस्तीत राहायला हवे असे सांगतानाच ज्यांचा तीर्थक्षेत्रावर मृत्यू होतो ते देवाच्या चरणी जातात, असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे. ही अत्यंत दुःखद घटना आहे. कोटय़वधी लोक तिथे आले होते. इतक्या गर्दीत एका जरी व्यक्तीकडून काही चूक झाली तर अशा घटना घडू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. प्रशासन त्यांचे कार्य योग्य प्रकारे करतेय, पण लोकांनी शिस्तीत रहायला हवे, असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.

ब्रह्ममुहूर्ताची वाट पाहत असतानाच दुर्घटना घडली

महाकुंभचे पोलीस महानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी 30 जणांचा बळी कसा गेला याबाबतचे सत्य सांगितले. भाविक ब्रह्ममुहूर्ताची वाट बघत होते. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे पवित्र मानले जाते. अचानक काही भाविक दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणावर आले. काहीही कल्पना नसताना पाठीमागून भाविकांची गर्दी आल्याने हलकल्लोळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. 29 जानेवारीला कुणीही व्हीआयपी येणार नव्हते. मुख्य स्नान पर्वणी असल्याने बैला परिसरातील आखाडय़ात गर्दीचा ओघ वाढला. त्यामुळे अलीकडे उभ्या असलेल्या लोकांनी पुढे उडी मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली.

6 कोटी भाविकांचे अमृतस्नान

महाकुंभात सकाळी 6 कोटी 61 लाख भाविकांनी अमृतस्नान केले. तर 28 जानेवारीपर्यंत 20 कोटी भाविकांनी स्नान केले. दिगंबर आखाडय़ातील संत आणि ऋषींनी बॅण्ड आणि संगीतासह अमृतस्नानासाठी प्रस्थान केले. संत धर्माचा ध्वज घेऊन ते पुढे चालत होते. भाजप खासदार हेमा मालिनी, कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनीही स्नान केले. दरम्यान, दुर्घटनेनंतरही अमृतस्नान साधारण तासभर बंद होते. अमृतस्नान सुरू झाल्यानंतर भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली.

 जबाबदारी लष्कराकडे सोपवा – अखिलेश यादव

महाकुंभमेळ्यासाठी येणाऱया भाविक, संतांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज असून महाकुंभची संपूर्ण जबाबदारी लष्कराकडे सोपवावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे. महाकुंभसाठी जागतिक दर्जाची व्यवस्था पुरवण्यात आल्याचा दावा राज्य सरकारने केला होता, परंतु त्यांच्या या दाव्यातील सत्य आता समोर आलेले आहे. जे लोक असा दावा करत होते, खोटा प्रचार करत होते त्यांनी महापुंभात प्राण गमावलेल्या लोकांची जबाबदारी घ्यायला हवी आणि पदाचा त्याग करायला हवा, असेही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

पोलीस, प्रशासन पळून गेले; रस्त्यात झोपलेल्यांना तुडवले

गर्दीच्या नियोजनासाठी ठिकठिकाणी उभारण्यात आलेले कठडे मोडून लोकांनी गंगेकडे कूच केले. रस्त्यात झोपलेल्यांना अक्षरशः तुडवण्यात आले. घाटावरही हीच अवस्था होती. या गर्दीत लहान मुले, वृद्धांची अवस्था बिकट झाली. कुणाचे कपडे हरवले. कुणाचे पाकीट गेले. कुणाचे आप्तस्वकीय हरवले. जमिनीवर लोकांच्या सामानाचा नुसता खच पडला होता. गर्दीची सुनामी बघून मेळा प्रशासन, पोलीस पळून गेले. अर्धा तास गंगाघाटावर नुसती पळापळ सुरू होती.
  • 25 मृतदेहांची ओळख पटली आहे. त्यात सर्वाधिक 19 जण उत्तर प्रदेशातील तर कर्नाटकातील 4, गुजरात आणि आसाममधील प्रत्येकी एका भाविकाचा समावेश आहे.
  • प्रचंड गर्दीमुळे प्रयागराजला येणारे आठही मार्ग बंद करण्यात आले आहेत. भदोही, चित्रकूट, काwशाम्बी, फतेहपूर, प्रतापगड, जौनपूर, मिर्झापूर सीमा सील करण्यात आल्या.
  • आखाडय़ांनी शाही स्नान रद्द करून योगी सरकारचे नाकच कापले गेले. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्व आखाड्यांच्या प्रमुखांशी संपर्क साधला. त्यानंतर शाही स्नानासाठी दुपारचा मुहूर्त ठरवण्यात आला.

निकम्मा प्रशासन -प्रेमानंदपुरी

कुंभमेळय़ाच्या नियोजनात राज्य सरकार पूर्णपणे फेल गेले असून या निकम्म्या प्रशासनाने केवळ हुजरेगिरीचे काम केले. जे कुणी व्हीआयपी आले त्यांच्या सेवेत हे प्रशासन लागले होते. त्यांना या कुंभमेळा आणि भाविकांशी कुठल्याही प्रकारचे देणेघेणे नव्हते, असा आरोप निरंजनी आखाडय़ाचे महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंदपुरी यांनी केला. हे सांगताना त्यांना अक्षरशः रडू कोसळले.  त्यांचा एक व्हिडीओ शिवसेनेने ‘एक्स’वरून शेअर केला आहे. आम्ही सर्व आखाडय़ांनी तब्बल 25 वेळा सांगितले की, महाकुंभचे व्यवस्थापन लष्कराकडे सोपवा. तसे झाले असते तर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडलीच नसती, असेही ते म्हणाले. आपल्या देशात सेवाभावी लोकांची कमी नाही. खूप दुःख झाले असे सांगताना त्यांना  रडू कोसळले.

हेल्पलाइन नंबर 1920

मृतांपैकी 25 भाविकांची ओळख पटली आहे. 60 जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची माहिती नातेवाईकांना मिळवण्यासाठी कुंभमेळा प्रशासनाने 1920 हा हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.

पोलीस सुरुवातीला म्हणाले, चेंगराचेंगरी झालीच नाही

चेंगचेंगरीची दृश्ये प्रसारमाध्यमांमध्ये, सोशल मीडियावर व्हायरल झाली असताना पोलिसांनी मात्र चेंगराचेंगरी झालीच नसल्याचे सुरुवातीला सांगितले. त्यांच्या या भूमिकेबद्दल भाविकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

पंतप्रधानांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत  केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. भाविकांना सुरक्षित प्रयागराज येथून आपल्या घरी जाता यावे यासाठी रेल्वेची किती तयारी आहे याचा आढावा घेतला. आज 360 हून अधिक ट्रेन प्रयागराज येथून सोडण्यात आल्या. प्रयागराजच्या विविध रेल्वे स्थानकांत दर चार मिनिटांनी ट्रेन येत आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. प्रयागराजच्या सर्व रेल्वे स्थानकांवर आरपीएफ आणि जीआरपीचे जवान तैनात आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येत असून कलर कोडनुसार प्रवाशांना रेल्वे स्थानकांत प्रवेश दिला जात असल्याचे ते म्हणाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश सीमेवर वाहनांच्या रांगा

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर महाकुंभसाठी येणाऱया भाविकांच्या अक्षरश: रांगा लागल्या आहेत. शेकडो वाहने अडकून पडल्याचे चित्र आहे. मौनी अमावास्येनिमित्त आज भाविक मोठय़ा संख्येने प्रयागराज येथे आले. रेवा शहराजवळ मोठय़ा संख्येने वाहने अडकून पडली. प्रयागराज येथून हे ठिकाण तब्बल 130 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ‘एक्स’वरून सांगितले.

एका तासात मोदींचा योगींना दोन वेळा फोन

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एका तासात दोन वेळा फोन केला आणि कुंभमेळय़ातील परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना तसेच भाविकांना तत्काळ मदत आणि त्यांच्या सुरक्षेबाबत सूचना केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शहा यांनी आदित्यनाथ यांना केले.