
लग्नाच्या जेवणात पनीर मिळाले नाही म्हणून एका माथेफिरु तरुणाने चक्क मिनी बस लग्नमंडपात घुसवली. यात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर तरुण फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत.
जखमींमध्ये नवरदेवाचे वडील आणि नवरीच्या काकांचाही समावेश असून त्यांच्यासह तिघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना वाराणसी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे. घटनेनंतर लग्न समारंभ थांबण्यात आला होता. मात्र पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने सकाळी विवाह सोहळा उरकला.
उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील हमीदपूर गावातील राजनाथ यांच्या मुलीचं शनिवारी रात्री लग्न होतं. राजनाथ यांच्या गावातीलच रहिवासी असलेला आरोपी तरुणही लग्नात सहभागी झाला होता. आरोपी जेवण करायला गेला. यावेळी त्याने जेवण वाढणाऱ्याकडे जास्त पनीर मागितले. मात्र जेवण वाढणाऱ्याने त्याला पुढे जायला सांगितलं. यामुळे वाद झाला. यावेळी नवरीच्या वडिलांनी तरुणाच्या डोक्यात मारलं. यामुळे तरुण संतापला.
संतापलेल्या तरुणाने थेट मिनी बस आणली आणि लग्न मंडपात घुसवली. यानंतर मंडपाच्या भोवती बस फिरवली. यात सहा जण जखमी झाले. यानंतर तरुण तेथून पसार झाला. घटनेनंतर लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.