दलित लेकीची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या, भाजपच्या राज्यात प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत अत्याचारी रावणांचा वावर

भाजपच्या राज्यात प्रभू श्रीरामांच्या अयोध्येत अत्याचारी रावण मोकाट फिरत आहेत. अयोध्येतून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय लेकीवर सामूहिक बलात्कार करून तिची अमानुषपणे निर्घृण हत्या करण्यात आली असून या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. एका नाल्यात निर्वस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळला असून दोन्ही डोळे काढण्यात आले आहेत आणि अंगावरही गंभीर जखमा आहेत. धक्कादायक म्हणजे, भागवत कथेसाठी ही तरुणी घरातून गेली होती आणि घरी परतलीच नाही.

अयोध्येतील कोतवालीच्या सहनवा गावात ही घटना घडली. 30 जानेवारीच्या रात्री ही तरुणी शुक्रवारी सायंकाळी भागवत कथा कार्यक्रमासाठी गेली होती. मध्यरात्र होत आली ती घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी संपूर्ण गावात तिचा शोध घेतला. तिचा कुठेही पत्ता लागला नाही. शनिवारी सकाळी तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न आणि हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना धक्काच बसला. मारेकऱयांनी क्रूरपणे तिचे डोळे काढले होते, हातपाय तोडले होते, चेहरा विद्रुप केला होता, तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी खोलवर जखमा होत्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असून विरोधकांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकारवर सडकून टीका होत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला, परंतु अद्याप त्यांच्या हाती काहीच धागेदोरे लागलेले नाहीत.

दलित, गरीबांचा आक्रोश ऐकणारे कुणीच नाही – प्रियंका गांधी

भाजपाचे जंगलराज सुरू असून या राज्यात दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि गरीबांचा आक्रोश ऐकणारे कुणीच नाही. उत्तर प्रदेश सरकार दलितांवर होणाऱया अत्याचारांवर मौन पाळून आहे, अशा शब्दांत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर तोफ डागली आहे. दलित तरुणीवर बलात्कार आणि हत्येची घटना मानवतेला काळिमा फासणारी असून आरोपी नराधमांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कारवाई न करणाऱया पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतानाच उत्तर प्रदेश सरकारने याबाबत उत्तर द्यावे असेही त्यांनी म्हंटले आहे.

पाच वर्षांपूर्वी हाथरसच्या घटनेने देश हादरला

पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. एका 19 वर्षीय दलित तरुणीवर चार उच्चवर्णीय पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. 11 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिने प्राण सोडले. त्यानंतर योगी सरकारवर हे प्रकरण दडपण्याचा आरोप विरोधकांनी केला होता. देशभरातून विरोधी पक्षांनी योगी सरकार आणि मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. संसदेतही हा मुद्दा चांगलाच तापला होता.

अयोध्येत भीतीचे वातावरण

दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर अयोध्येत भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलिस कोणत्याही प्रकारची कारवाई गांभीर्याने करत नसल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केवळ आश्वासनच दिले आहे. मात्र, कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही, असा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.

योगींचे असंवेदनशील विधान

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारवाईऐवजी सपा खासदार अवधेश प्रसाद यांच्या पत्रकार परिषदेच्या व्हिडीओवरून टीका केली. ही सगळी नौटंकी असून दलित तरुणीच्या हत्या प्रकरणात अवधेश प्रसाद यांच्याच लोकांचा हात असू शकतो, असा संशय घेत मुख्यमंत्र्यांनी असंवेदनशीलता दाखवली.

कुठे आहेत राम आणि सीतामाई? अवधेश प्रसाद ढसाढसा रडले

लेकाRची अब्रू आम्ही वाचवू शकत नाही. इतिहास आम्हाला माफ करणार नाही. प्रभू श्रीराम, सीतामाई कुठे आहेत, असा आर्त सवाल करत अयोध्येतील समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद ढसाढसा रडले. मी यावर लोकसभेत आवाज उठवणार, मोदींकडे न्याय मागणार. दलित लेकीला न्याय मिळाला नाही तर खासदारकीचा राजीनामा देणार, असे त्यांनी सांगितले.

भाजपशासित राज्यातच हे का घडतं?

दलित लेकीची अमानुष हत्या मन हेलावून टाकणारी आणि तितकीच लाजिरवाणी बाब आहे. तीन दिवसांपासून पीडितेचे कुटुंब मदतीसाठी टाहो फोडत होते. त्याकडे लक्ष दिले असते तर कदाचित या लेकीचे प्राण वाचले असते. किती कुटुंबांवर आणि कधीपर्यंत असे आघात होणार आहेत. बहुजनविरोधी भाजपच्या राज्यातच दलितांवरील हे अत्याचार वाढत आहेत. हे थांबवा. दोषींवर कठोर कारवाई करा. दलित समाजासोबत न्याय करा, अशा तीव्र भावना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या.