मुलाच्या अस्थिविर्सजनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह चौघांचा जागीच मृत्यू

मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. मुलाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या अस्थिविसर्जनाला जात असताना आई-वडिलांसह चौघांवर काळाने घाला घातला. कार रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरवर धडकल्याने अपघात झाला. यात कारमधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजकुमार शर्मा, कमलेश भार्गव, शुभम आणि पराग अशी मयतांची नावे आहेत. तर काश्विक आणि चारु अशी जखमींची नावे आहेत. झाशी येथील रहिवासी असलेल्या राजकुमार यांचा मुलगा आदित्य याचा 12 एप्रिल रोजी ओंकारेश्वर नदीत अंघोळीला गेला असता बुडून मृत्यू झाला. मुलाचे सर्व अंत्यविधी आटोपल्यानंतर आई-वडिलांसह कुटुंबातील सहा जण त्याच्या अस्थिविसर्जन करण्यासाठी प्रयागराज येथे चालले होते.

प्रयागराजला जात असताना फतेहपूरजवळ चालकाला डुलकी आल्याने कार अनियंत्रित झाली आणि डंपरवर धडकली. यात कारमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. जखमींमध्ये एका 10 वर्षीय मुलाचा आणि महिलेचा समावेश आहे.