
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील संत कबीर नगर येथील एका तरुणाने त्याच्या पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत लग्न लावल्याचे समोर आले होते. हल्ली बॉयफ्रेंडसाठी महिला आपल्या पतीचा खून करण्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे आपण आधीच तिचं लग्न लावून देतोय असे सांगत त्याने पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करून पाठवून दिले. त्यांच्या दोन मुलांची जबाबदारीही त्यानेच घेतली. मात्र दोन दिवसातच त्याला आपल्या या निर्णयाचा पश्चाताप झाला व तो थेट पत्नीला परत आपल्या घरी घेऊन आला.
कटार गावातील बबलूचे गोरखपूर येथील राधिकाशी 2017 साली लग्न झाले होते. या दोघांना दोन मुले देखील आहेत.राधिकाचे गेल्या दीड वर्षांपासून तिच्याच गावातील विशालसोबत प्रेमसंबंध होते. मात्र जेव्हा बबलूला हे कळले तेव्हा त्याने राधिकाला नाते संपवण्यास सांगितले. पण राधिकाने त्याला नकार दिला. त्यामुळे वाद घालण्याऐवजी, बबलूने शांततेने परिस्थिती सोडवण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वतःच आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकरासोबत लावण्याचा निर्णय घेतला. सोमवारी 24 मार्च रोजी तो राधिका आणि विशालसोबत धनघाटा तहसीलमध्ये पोहोचला. तिथे या दोघांच्याही लग्नाची कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यात आली. यानंतर, गावातील लोकांच्या उपस्थितीत दोघांचेही लग्न मंदिरात करण्यात आले.
दोन दिवसांत युटर्न
सर्वांदेखत दोन्ही मुलांची जबाबदारी आपण घेत असल्याचे बबलूने जाहीर केले होते. मात्र दोन दिवसांतच त्याला मूलं सांभाळणं सोपं नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने मंगळवारी थेट विकासचे घर गाठले व मुलांसाठी राधिकाला परत पाठवा अशी विनंती केली. विकासने देखील त्याचे म्हणने ऐकले व राधिका बबलूसोबत माघारी गेली.