जेवण वाढायला उशीर झाल्याचे कारण देत एका तरुणाने थेट मांडवातच लग्नाला नकार दिला आहे. उत्तर प्रदेशमधील चंदौली गावात हा प्रकार घडला आहे. दरम्यान ठरलेले लग्न मोडून काही वेळातच या तरुणाने त्याच्या चुलत बहिणीसोबत लग्न केले. त्यामुळे त्याने बहिणीशी लग्न करण्यासाठीच तर हा बनाव रचल्याचा संशय मुलीकडच्यांना असून त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
हमीदपूर येथे राहणाऱ्या या तरुणीचे मेहताबसोबत सात महिन्यापूर्वी लग्न ठरले होते. 22 डिसेंबर रोजी त्यांचे लग्न होणार होते. मुलीच्या घरीच हे लग्न होणार होते. मुलगा व त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी लग्नाच्या दिवशी तिच्या घरी आले. मात्र मेहताब जेव्हा जेवायला बसला तेव्हा त्याला जेवण वाढायला थोडा उशीर झाला. त्यावरून मेहताबच्या मित्रांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. त्यामुळे संतापलेला मेहताब मुलीच्या पालकांला उलट सुलट बोलू लागला. त्यामुळे वाद वाढला. त्यानंतर मेहताबने ते लग्न मोडले व वरात घेऊन माघारी गेला. मात्र काही तासातच मेहताबने त्याच्या चुलत बहिणीसोबत लग्न केले.
या प्रकरणी सदर तरुणीने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या पालकांनी या लग्नावर तब्बल सात लाख रुपये खर्च केले होते. तसेच लग्नाच्या काही तास आधीच मुलाच्या पालकांना दीड लाख रोख रक्कम देखील दिली होती, असे या तक्रारीत म्हटले आहे.