उत्तर प्रदेशातील एका लग्न समारंभात भयंकर घटना घडली आहे. लग्नात मंगलाष्टकं सुरू असताना नवरदेवाने दारूच्या नशेत आपल्या सासू सासऱ्यांच्या कानशीलात लगावली आहे. त्यामुळे लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. दरम्यान संतापलेल्या वधूने लग्नास नकार देत पुढील विधी थांबवले आणि थेट पोलिसात तक्रार नोंदविली.
सदर घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडली आहे. येथे नववधू अंजली (18) आणि वर दिलीप (25) यांच्या लग्नसोहळ्याचे आयोजन केले होते. या लग्नसोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबाचे नातेवाईक उपस्थित होते. दरम्यान विधिवत लग्नसमारंभ सुरू असताना दारूच्या नशेत असलेल्या नवरदेवाने अचानक अंजलीची आई मनीषा आणि वडील संतोष यांना कानाखाली मारली. त्यामुळे वधूचा राग अनावर झाला आणि तिने या लग्नास नकार दिला. दरम्यान वधूच्या नातेवाईकांनी लगेचच पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. गिरवण पोलिसांनी वर दिलीप, त्याचा मोठा भाऊ दीपक, मामा माता प्रसाद आणि वडील रामकृपाल यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. यावेळी दोन्ही गटात वाद झाला. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही पक्षांनी लग्नास मंजूरी दिली. त्यानंतर विद्यावासिनी मंदिरात दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला.