उत्तम जानकर आणि अजित पवार यांचा एकाच गाडीतून प्रवास

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुण्यातील सर्पिट हाऊसपासून ते कौन्सिल हॉलपर्यंत  एकाच गाडीमधून प्रवास केला आहे. यावेळी अजित पवार आणि जानकर यांची जवळपास दहा मिनिटे चर्चा झाली. मात्र, कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून फक्त पाण्याच्या संदर्भात चर्चा केल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.

आमदार जानकर म्हणाले, अजितदादांसोबत पाण्याच्या संदर्भात चर्चा केली. तालुक्यातील विकासकामांसाठी मंत्र्यांची भेट घ्यावी लागते. अजित पवार गटात प्रवेशावर जानकर म्हणाले, मी शरद पवार गटाचा आमदार आहे. आमचे 10 लोक आमदार आहेत. एका आमदारामुळे काही फरक पडत नाही. गेलो तर राजीनामा देऊन जावं लागेल. महायुतीचे संख्याबंळ पाहता त्यांच्या पक्षाला गरज नाही. आमचे सगळे मिळून 50 आमदार आहेत. त्यामुळे गरज नसताना ते कशाला बोलावतील.