Face Care- सकाळी उठल्यावर चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी या पदार्थांचा वापर आहे गरजेचा!

सकाळी उठल्यावर अनेकांचा चेहरा हा सुजल्यासारखा दिसू लागतो. खासकरून जाड लोकांना ही समस्या नेहमीच येते . इतकेच नव्हे तर बारीक शरीरयष्टी सडपातळ असूनही कांही जणांचा चेहरा गुबगुबीत दिसतो त्यामागे फेशियल फॅट हे कारण असते. शरीराच्या अन्य भागावरची चरबी कांही खास डिझाईनचे, रंगाचे, प्रिटचे कपडे वापरून झाकता येते मात्र चेहर्‍यावरची चरबी लपविणे अशक्य असते.

चेह-यावर अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे काही वेळा चेहरा बेढब दिसायला लागतो. अनेकवेळा आपला चेहरा असा आहे याचा अनेकांना न्यूनगंड वाटल्याने अशा व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी योग्य आहार आणि चेह-याचे ठराविक व्यायाम करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळे उपचार घेऊन चेह-याला नुकसान पोहोचवण्यापेक्षा काही घरगुती उपायांमुळे गळा, मान, गाल यांच्यावरील अतिरिक्त चरबी कमी करता येते. दूधामध्ये अनेक पोषकद्रव्य असून दूधामुळे चेह-याचा रंग उजळण्यास मदत होते. चेह-यावर दूधाचा वापर केल्यास चेह-यावरील सुरकुत्यादेखील कमी होतात. यासाठी 1 चमचा दूध आणि 1 चमचा मध हा पॅक अतिरिक्त चरबी असलेल्या भागावर लावून मसाज करावा. यानंतर 10 मिनीटांनी पॅक धुवावा. आठवड्यातून 2 वेळा हा प्रयोग करावा.

फुगलेल्या चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी काकडीचा चांगला उपयोग होतो. फायबर आणि पाण्याचे प्रमाण काकडीमध्ये जास्त असते. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. चेहऱ्यावर याचा डायरेक्टली प्रयोग करू शकता. चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारची सूज कमी करायला काकडीचा उपयोग होतो. शरीरात पाणी कमी झाल्यामुळे देखील गालावर सूज येऊ शकते त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कायम समान ठेवावी. त्यासाठी दिवसातून कमीत कमी 8  ते 9 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

आपण मीठ आणि साखर पूर्णपणे वगळू शकत नसाल तरी, आपल्या आहारातून खारट किंवा गोड पदार्थ कमी करण्याचा प्रयत्न करा आणि मीठ किंवा साखर कमी प्रमाणात असलेले पदार्थ खा. मद्यपान केल्यामुळे शरीराबरोबरच चेह-यावर सूज येते त्यामुळे मद्यपान करणे टाळावे. मद्यपानामुळे अनेक शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळत असल्याने ते टाळलेलेच बरे. झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोनल बदल होऊ लागतात ज्यामुळे वजन वाढते. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. आपल्या आहारामध्ये अधिक फळे आणि भाज्या जोडल्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी खाण्याच्या निरोगी सवयी तर लागतीलच तसेच तुमचे एकूणच संपूर्ण शरीराचे वजन कमी करण्यास देखील असा नियमित आहार मदत करेल.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)