1 ऑक्टोबरपासून सिमच्या नेटवर्कची माहिती समजणार

हिंदुस्थान दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या सूचनेनुसार, येत्या 1 ऑक्टोबरपासून सिम कार्डमध्ये किरकोळ बदल केले जाणार आहेत. या नव्या नियमामुळे यूजर्सला त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नेटवर्कची माहिती मिळू शकणार आहे. टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएल कंपन्यांना आपापल्या नेटवर्कसंबंधी माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ट्रायने दिले आहेत.

नव्या नियमामुळे एकाच टेलिकॉम कंपनीकडून विविध ठिकाणी वेगवेगळे नेटवर्क उपलब्ध होऊ शकतात. 5 जी नेटवर्कची उपलब्धता स्थानांनुसार बदलू शकते. यूजर्स आता आपले लोकेशन टाकून टेलिकॉम कंपन्यांच्या वेबसाईटवर जाऊन कोणते नेटवर्क मिळत आहे, याची माहिती जाणून घेऊ शकतात. लोकेशन बदलताच नेटवर्कसुद्धा बदलते. कधी 5 जी नेटवर्क तर कधी 4 जी, 3 जी नेटवर्क मिळते. त्यामुळे यूजर्सने अलर्ट राहणे गरजेचे आहे. टेलिकॉम कंपन्यांना याची माहिती देणे बंधनकारक आहे.