बांधकामांची धूळ रोखण्यासाठी मिस्ट कॅनॉन तंत्रज्ञानाचा वापर; सर्व 24 विभागांमध्ये पाण्याची फवारणी सुरू

शहरात बांधकाम आणि रस्ते कामांमधून उडणाऱ्या धुळीमुळे वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने आता अत्याधुनिक ‘मिस्ट कॅनॉन’ संयंत्राद्वारे पाणी फवारणीचे काम सुरू केले आहे. सर्व 24 विभागांमध्ये याचा वापर सुरू करण्यात आला आहे. शिवाय रस्तेदेखील ब्रशिंग करून धुण्यासाठी 100 टँकरची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

वातावरणीय बदलांमुळे हवेच्या दर्जात होणारे बदल, त्यातून जनजीवनावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धतीसह उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. यामध्ये रस्ते स्वच्छतेचादेखील समावेश आहे. या अंतर्गत आता प्रमुख आणि छोटय़ा रस्त्यांवरील स्वच्छता व धूळ प्रतिबंधासाठी संयंत्रांचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. त्याचबरोबर वर्दळीच्या रस्त्यांवर नियमितपणे पाण्याची फवारणी केली जात आहे. सद्यस्थितीत 24 प्रशासकीय विभागांमध्ये ट्रक माऊंट फॉग मिस्ट कॅनॉन संयंत्रांद्वारे पाणी फवारणी केली जात आहे.

पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदूषण नियंत्रणाचे काम सुरू आहे.

असे होतेय काम

पालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांमध्ये ट्रक माऊंट फॉग मिस्ट कॅनॉन संयंत्रांद्वारे दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) पाणी फवारणी केली जात आहे. ज्या ठिकाणी बांधकाम, पाडकाम, खोदकाम सुरू आहे, अशा ठिकाणी प्रकर्षाने पाणी फवारणी केली जात आहे. वॉर्डातील दुय्यम अभियंता (पर्यावरण) विविध विभागांशी समन्वय साधून दररोज स्थळ पाहणी करून वाहनांचे मार्ग निश्चित करतात.

यासोबतच रस्ते ब्रशिंग करून पाण्याने धुवून काढण्यासाठी 100 टँकर तैनात करण्यात आले आहेत. त्यात 5 हजार लिटर क्षमतेच्या 67 आणि 9 हजार लिटर क्षमतेच्या 39 टँकरचा समावेश आहे. रस्ते, पदपथ स्वच्छतेसाठी ई-स्वीपर संयंत्राचा अवलंब करण्यात येत आहे. उघड्या वाहनांतून राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईदेखील करण्यात येत आहे.