![donald trump](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/donald-trump--696x447.jpg)
हमासने इस्रायलसोबतचा युद्धविराम रद्द करण्याचे तसेच इस्रायली ओलिसांना सोडण्यास विलंब करण्याचे संकेत दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज पारा चढला. ओलिसांना शनिवारपर्यंत सोडा अन्यथा गाझात विध्वंस होईल. सर्वकाही उद्ध्वस्त करून टाकू, अशी धमकी ट्रम्प यांनी हमासला दिली आहे. ट्रम्प यांनी इस्रायली ओलिसांना सोडण्यासाठी हमासला शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. ओलिसांना सोडले नाही तर युद्धविराम करार रद्द करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. युद्धबंदी सुरू ठेवायची की संपवायची याचा निर्णय सर्वस्वी इस्रायलचा असेल, परंतु उर्वरित सर्व ओलिसांना तीन किंवा चारच्या गटात सोडू नये तर एकत्रच सोडले पाहिजे. आम्हाला सर्व ओलिसांची एकाचवेळी सुटका हवी आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हमास युद्धविराम कराराचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करत इस्रायलने यापूर्वी युद्धविराम रद्द करण्याची धमकी दिली होती.
हमास म्हणाले मुद्दा आणखी चिघळेल
ट्रम्प यांनी हमास आणि इस्रायल या दोन्ही गटाला सहकार्य करावे. दोघांची बाजू समजून घ्यावी. जर त्यांनी अशा प्रकारे विध्वंस करण्याची धमकी दिली तर मुद्दा आणखी चिघळेल, असे हमासचे प्रवक्ते सामी अबु झुरी यांनी म्हटले आहे. युद्धविराम करारात दोन्ही गटाचा सन्मान करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे ट्रम्प यांनी विसरू नये. दरम्यान, युद्धविराम करारानुसार 19 जानेवारीपासून हमासने 21 ओलिसांना सोडले आहे, तर इस्रायलने 730 पॅलेस्टिनी पैद्यांना सोडले आहे.
जॉर्डन आणि इजिप्तची मदत थांबवण्याची धमकी
इजिप्त आणि जॉर्डन यांनी पॅलेस्टिनींना आश्रय दिला नाही तर अमेरिका त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवेल अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. गाझा विकत घेऊन तेथे आर्थिक पायाभरणी करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच पॅलेस्टिनींना इतरत्र हलवणार असल्याबाबतही त्यांनी विधान केले. या पार्श्वभूमीवर जॉर्डन आणि इजिप्त या देशांनी पॅलेस्टिनींना आश्रय द्यावा अशी ट्रम्प यांची भूमिका आहे.
अरब राष्ट्रांचा ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध
गाझापट्टी ताब्यात घेऊन पॅलेस्टिनींना इतरत्र हलवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला अरब राष्ट्रांनी विरोध केल्याचे इजिप्तच्या उच्चाधिकाऱयांनी अमेरिकेतील राज्य सचिव राकौ रुबियो यांना सांगितले आहे. या मुद्द्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संयुक्त राष्ट्राचे सचिव जनरल अँटेनियो गुटेरस यांनी युद्धविराम करार वाढवावा, अशी मागणी केली.
गाझापट्टीभोवती इस्रायलचे सैन्य तैनात
हमासच्या धमकीनंतर इस्रयालचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझापट्टीभोवती सैन्य तैनात केले आहे. प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्यासाठी तयार राहा असे आदेश नेतन्याहू यांनी सैन्याला दिले आहेत. सद्यस्थितीबद्दल नेतन्याहू यांनी आपल्या सुरक्षा केबिनेटसोबत तब्बल चार तास चर्चा केली. युद्धविराम सध्याच्या घडीला नाजूक स्थितीत असून कुठलीही स्थिती निर्माण होऊ शकते असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.