America- ट्रम्प प्रशासनाचे जाचक निर्बंध; ग्रीन कार्ड, एच-1 बी आणि एफ-1 व्हिसाधारकांमध्ये धास्ती!

अमेरिकमेध्ये डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून, व्हिसासंबंधी नियम दिवसागणिक अधिकाधिक जाचक होऊ लागले आहेत. ट्रम्प प्रशासनातर्फे नुकतेच व्हिसाधारक नागरिकांच्या संदर्भातील धोरणे अधिक कडक केली आहेत. म्हणूनच अमेरिकेत येणाऱ्या आणि जाणाऱ्यांना, जाचक चौकशीला आणि विविध अर्ज दाखवण्याच्या प्रक्रीयेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला ग्रीन कार्डधारक अमेरिकेबाहेर जाण्यासाठी तयार नाहीत.

ग्रीन कार्ड धारकांनाही अमेरिकेत अनिश्चित काळासाठी राहण्याचा अधिकार नाही, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी म्हटले होते. तेव्हापासून अमेरिकेत राहणारे ग्रीन कार्ड, एच-1 बी व्हिसा आणि एफ-1 व्हिसा धारक देशातून बाहेर जाण्यास घाबरत आहेत.

ग्रीन कार्ड, एच-1 बी आणि एफ-1 व्हिसाद्वारे मोठ्या संख्येने हिंदुस्थानी अमेरिकेत राहतात आणि काम करतात. यामुळेच हिंदुस्थानी नागरिकांमध्ये या नवीन धोरणांमुळे सध्या खूप ताण आणि चिंता दिसत आहे. त्यामुळेच वकिलांनीही हिंदुस्थानी नागरिकांना अमेरिकेबाहेर प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

ट्रम्प सरकारच्या काळामध्ये स्थलांतरितांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. मग ते बेकायदेशीर स्थलांतरित असोत किंवा अमेरिकेत कायदेशीररित्या राहणारे स्थलांतरित असोत. परदेशात प्रवास करणाऱ्या किंवा परदेशातून अमेरिकेत परतणाऱ्या लोकांना तासन् तास विविध चौकशांना सामोरे जावे लागत आहे. विमानतळावरच त्यांची सर्व वैध कागदपत्रे मागितली जात आहेत. अमेरिकेत यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस किंवा यूएससीआयएस, इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट किंवा आयसीई, डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी किंवा डीएचएस आणि कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन किंवा सीबीपी सारख्या एजन्सी आहेत ज्या स्थलांतरितांचा सर्व रेकाॅर्ड ठेवतात.

अमेरिकेत कायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना हद्दपारीचा धोका कमी असला तरी, त्यांनाही तासन् तास चौकशी कशी आणि तपासणीला सामोरे जावे लागू शकते. ट्रम्प प्रशासन 43 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्याचा विचार करत आहे. यामध्ये हिंदुस्थानचा शेजारील देश पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भूतान यांचाही समावेश आहे. अमेरिकेत हिंदुस्थानींकडे चांगले नागरिक म्हणून पाहिले जाते जे कर भरतात आणि कायद्याचे पालन देखील करतात, परंतु ट्रम्प प्रशासनाच्या कठोर धोरणांमुळे हिंदुस्थानी स्थलांतरित देखील तपास संस्थांच्या रडारवर आले आहेत.

सध्याच्या घडीला अमेरिकेत देशाबाहेर प्रवास करताना विविध कागदपत्रे बाळगणे बंधनकारक केलेले आहे. यात पासपोर्ट, ग्रीन कार्ड, वैध एच-1 बी किंवा एफ-1 व्हिसा परमिट यांचा समावेश आहे. एका वर्षापेक्षा जास्त काळ अमेरिकेबाहेर आहेत त्यांना देखील पुनर्प्रवेश परमिट दाखवावा लागेल. याशिवाय, कर्मचारी पुष्टीकरण पत्र, कर भरल्याची कागदपत्रे, पगार स्लिप, उत्पन्नाचे वैध कागदपत्रे, महाविद्यालय किंवा विद्यापीठाचे वैध पत्र, अमेरिकेतील बँक खात्याची कागदपत्रे आणि ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत.