अमेरिका चीनवर लादणार 104 टक्के आयात शुल्क, व्हाइट हाऊसमधून घोषणा; आजपासून लागू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अतिरिक्त 50 टक्के कर लादण्याची धमकी दिल्यानंतर चीननेही व्यापारयुद्ध झाल्यास शेवटपर्यंत लढू असा इशारा दिला. परंतु, चीनचा हा इशारा गांभीर्याने न घेता उलट चीनवर तब्बल 104 टक्के आयातशुल्क लागू करणार असल्याची घोषणा व्हाईट हाऊसमधून करण्यात आली आहे. हे आयातशुल्क तत्काळ प्रभावाने 9 एप्रिलपासून लागू होईल असेही सांगण्यात आले आहे.

चीनने अमेरिकेवर लादलेले 34 टक्के आयातशुल्क मागे घेतले नाही तर त्यापूर्वी घोषित केलेले 34 टक्के आणि त्यानंतर जाहीर केलेले 50 टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादण्यात येईल अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. जो देश अमेरिकेच्या आयातशुल्काला अतिरिक्त आयातशुल्क लादून उत्तर देईल त्या देशाला सुरुवातीला निश्चित करण्यात आलेल्या आयातशुल्काच्या तुलनेत भरमसाट आयातशुल्क लादून उत्तर दिले जाईल असा इशारा मी यापूर्वीच दिला होता असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर चीनसोबत होणाऱ्या सर्व बैठकाही रद्द करण्यात येतील आणि ज्या देशांनी बैठकांसाठी विनंती केली आहे त्यांच्यासोबत बोलणी सुरू करण्यात येतील, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

काय म्हटले होते चीनने?

अमेरिका लादलेले शुल्क आणखी वाढवण्याची धमकी देऊन एकामागून एक चुका करत आहे. या धमकीवरून अमेरिकेची ब्लॅकमेलिंग वृत्ती स्पष्टपणे दिसत आहे. चीन हे कधीही स्वीकारणार नाही. जर अमेरिका अशीच मनमानी करत राहिली तर चीनही व्यापारयुद्धासाठी तयार असून शेवटपर्यंत लढेल. यासाठी मागे पुढे पाहणार नाही. त्यातून आणखी मजबूतपणे बाहेर पडेल, असे चीनने म्हटले होते.