डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने अमेरिकेतही भूकंप; डाऊ जोन्स 1600 अंकांनी घसरला; 2020 नंतर दिवसभरातील मोठी घसरण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिका फर्स्ट या धोरणाची ट्रम्प यांनी घोषणा केली होती. अमेरिकेच्या हितासाठी आणि ट्ररिफसाठी आग्रही असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, अमेरिकेतील शेअर बाजारांना ट्रम्प यांचा निर्णय रुचला नाही आणि वॉल स्ट्रीटवरील अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होणार आहे. अमेरिकेचा प्रमुख निर्देशांक डाऊ जोन्स 1600 अंकांनी घसरला तर एस अँड पी 500 अंकांनी घसरला. नॅस्डॅकमध्ये 2020 नंतरची एका दिवसातील ही मोठी घसरण आहे.

अमेरिकेचा निर्देशांक डाऊ जोन्स गुरुवारी 1679 अंकांनी (-3.98 टक्के) घसरून 40,545.93 वर बंद झाला. तर नॅस्डॅक 5.97 टक्के घसरून 16,550.61 वर बंद झाला. 400 हून अधिक एस अँड पी 500 शेअर्स लाल निशाणीत बंद झाले. या घसरणीमुळे निर्देशांक फेब्रुवारीच्या उच्च्यांकापेक्षा 12 टक्क्यांनी खाली आला. 2020 नंतर एका दिवसातील ही मोठी घसरण असून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर व्यापार युद्ध आणि अमेरिकेच्या मंदीच्या भीतीने गुरुवारी वॉल स्ट्रीटवर जोरदार विक्री झाली. 2020 नंतरच्या एका दिवसातील सर्वात मोठी घसरण दिसून आली. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोठा फटका बसला. नायकेचा शेअर 13 टक्के, अ‍ॅपल 10 टक्के आणि एनव्हिडिया 7 टक्क्यांनी घसरले. प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरने एका दिवसातील सर्वात मोठी घसरण अनुभवली, जी प्रमुख चलनांच्या तुलनेत 2.1 टक्क्यांनी घसरली.

ट्रम्प यांच्या मोठ्या प्रमाणात व्यापार शुल्क आकारणीचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या संभाव्य नकारात्मक परिणामाबद्दल गुंतवणूकदार चिंतेत आहेत. त्यामुळे डॉलरऐवजी जपानी येन आणि स्विस फ्रँकसारख्या सुरक्षित मालमत्तांकडे वळले जाईल. फेडरल रिझर्व्हकडून वाढीला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा असल्याने डॉलरमधील घसरण आणखी वाढली आहे, ज्यामुळे डॉलर आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे.

वॉल स्ट्रीटवरील या घसरणीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया दिली. बाजारातील घसरण ही टॅरिफ धोरणांमुळे असल्याचा त्यांनी नकार दिला. तसेच अमेरिकन बाजारात नक्कीच तेजी येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेची अर्थव्यवस्था विजयी होईल, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. ट्रम्पच्या बुधवारच्या टॅरिफच्या घोषणेनंतर आशिया आणि युरोपमधील बाजारपेठांमध्येही मोठी घसरण दिसून आली.

ट्रम्प यांनी सर्व राष्ट्रांवर कमीतकमी 10 टक्के आयात शुल्क लादले. त्याचा परिणाम जगभरात दिसत असून अमेरिकेच्या शेअर बाजारालाही मोठा फटका बसला आहे. सर्व जगभरातून ट्रम्प यांच्या निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे. आगामी काळातील टॅरिफ वॉरचा जगभरातील शेअर बाजारावर विपरीत परिणाम होणार असून हिंदुस्थानातील शेअर बाजाराही गुरुवारी गॅप डाऊनने सुरू होतील, अशा शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.