ट्रम्प सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; अमेरिकेत राहणाऱ्या 5 लाख नागरिकांवर सक्रांत; हिंदुस्थानींचं काय?

अमेरिकेमध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेमध्ये बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना आधी बाहेरचा रस्ता दाखवला. आता ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या चार देशांच्या पाच लाख नागरिकांना तातडीने देश सोडावा लागू शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने अमेरिकेतील स्थलांतर धोरणात मोठा बदल केला आहे. ट्रम्प सरकारने क्यूबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला या चार देशांतील जवळपास 5 लाख 30 हजार स्थलांतरितांचे कायदेशीर संरक्षण रद्द केले आहे. यामुळे या देशातील नागरिकांना अमेरिकेमध्ये राहण्याची परवानगी असलेला मानवतावादी पॅरोल हा दर्जा 24 एप्रिलनंतर रद्द होईल. या सर्व नागरिकांनी ऑक्टोबर 2022 मध्ये आर्थिक प्रायोजकासह यूएसमध्ये प्रवेश केला होता. आता ही पॅरोलच रद्द होणार असल्यामुळे या नागरिकांना तातडीने अमेरिका सोडावी लागू शकते.

मानवतावादी पॅरोल प्रणाली काय आहे?

मानवतावादी पॅरोल प्रणाली ही युद्ध आणि राजकीय अस्थिरतेचा सामना करणाऱ्या देशातील नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात अमेरिकेमध्ये प्रवेश आणि राहण्याची परवानगी देण्यासाठी वापरली जाते. याच प्रणाली अंतर्गत माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी क्यूबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला या देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी दिली होती. मात्र याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचा आरोप करत ट्रम्प प्रशासनाने ही प्रणालीच रद्द केली आहे.

मूल नको! अमेरिकेत जन्म दर घटला; मिलेनियल्स आणि जेन झेडची मानसिकता