जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) आज आपले 47 वे राष्ट्राध्यक्ष निवडणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका आणि निकालाकडे लागल्या आहेत. विद्यमान उपाध्यक्ष आणि सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत आहे.
दोन्ही नेत्यांपैकी कोण निवडून येईल, याकडे जगभराचे लक्ष्य लागले आहे. यातच या दोघांपैकी कोणता नेता निवडून आल्यास हिंदुस्थानला फायदा होऊ शकतो. याचा हिंदुस्थानच्या संरक्षण धोरणे आणि आर्थिक विकासावर काय परिणाम होऊ शकतो, हे आपण जाणून घेणार आहोत…
या निवडणुकीचा मोठा परिणाम हिंदुस्थानच्या संरक्षण धोरण, व्यापार आणि धोरणात्मक क्षेत्रातील हिंदुस्थान – अमेरिका द्विपक्षीय संबंधांवर होईल. कारण अमेरिका हा हिंदुस्थानातील एक प्रमुख गुंतवणूकदार देश आहे, जो पायाभूत सुविधांपासून उत्पादन, तंत्रज्ञान विकास आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये महत्त्वाचा आहे. याशिवाय मोठ्या संख्येने अनिवासी हिंदुस्थानी रोजगाराच्या शोधात अमेरिकेतील विविध भागात स्थायिक झाले आहेत. यासाठी हे महत्त्वाचं आहे.
UP Madarsa Act: उत्तर प्रदेश मदरसा कायदा योग्यच, सर्वोच्च न्यायालयाने HC चा निर्णय बदलला
ट्रम्प जिंकल्यास काय परिणाम होईल?
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकून पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तर याचा हिंदुस्थानच्या आर्थिक धोरणावर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई वाढू शकते, असे आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांना आयातीवर शुल्क लावायचे आहे, ज्यामुळे परदेशी वस्तू अधिक महाग होतील. डोनाल्ड ट्रम्प कंपन्यांना अमेरिकेत अधिक उत्पादन करण्यास प्रोत्साहित करत आहेत. ज्यामुळे खर्च देखील वाढू शकतो. मिंटच्या अहवालात असे म्हटले आहे की, ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलच्या मते, ट्रम्प यांची धोरणे विस्तारवादी आहेत. कॉर्पोरेशन, विशेषत: यूएस मधील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी कर दर कमी करण्यास त्यांनी आपलं प्राधान्य असल्याचं सांगितलं आहे. स्थलांतरितांनी आपला देश ताब्यात घेतला आहे, असं ट्रम्प यांचं म्हणणं. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. ट्रम्प यांच्या कार्यकाळात डॉलर मजबूत होऊ शकतो, याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होईल, असा अंदाज आहे.
कमला हॅरिस जिंकल्यास परिणाम होईल?
दुसरीकडे कमला हॅरिस या उदारमतवादी आणि स्टेटस क्विस्ट मानल्या जातात. त्या हिंदुस्थानी वंशाच्या आहेत. त्यांच्या कुटुंबाची मुळे हिंदुस्थानशी जोडलेली आहेत. पण काही प्रसंगी त्यांची भूमिका हिंदुस्थानप्रती कठोर राहिली आहे. 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर त्यांनी हिंदुस्थानविरोधात भूमिका घेतली होती. मात्र जेव्हापासून त्यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली, तेव्हापासून त्या हिंदुस्थानाशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी मौन आणि तटस्थ भूमिका घेतली. याशिवाय कमला हॅरिस यांनी हिंदुस्थान आणि चीनमधून होणाऱ्या आयातीवर शुल्क न वाढवण्याच्या आणि यथास्थिती कायम ठेवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.