
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या ट्रम्प सरकारला येत्या 30 एप्रिल रोजी 100 दिवस पूर्ण होणार आहेत. ट्रम्प यांनी या 100 दिवसांत जगाला हादरवून टाकणारे धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांच्या निर्णयाने युरोपपासून आशियापर्यंत धडकी भरली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक धडाधड निर्णय घेतले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर टॅरिफ लावण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी संपूर्ण जगावर टॅरिफ लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण जगाला हादरे बसले आहेत. ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांना 90 दिवसांची सूट यातून दिली आहे. ट्रम्प यानी कमकुवत देशाला दिली जाणारी मदत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आधी गरीब देशांना पाण्यापासून अन्नधान्यापर्यंत आणि औषधांसाठी फंड देत होता, परंतु तो फंड ट्रम्प यांनी थांबवला आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) मधून अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांना इराणसोबत न्यूक्लियर डील करायची आहे. 2018 मध्ये ही डील तोडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, परंतु आता ट्रम्प यांना ही डील करायची आहे. कॅनडा हे यूएसचे 51 वे राज्य असावे यासाठी ट्रम्प प्रयत्न करत आहेत. ग्रीनलॅण्ड, पनामा आणि गाझापर्यंत कंट्रोल हातात ठेवण्यासाठी ट्रम्प प्रयत्नशील आहेत. ट्रम्प दुसऱयांदा सत्तेत येताच अमेरिकेतील सरकारी नोकऱयांमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. एलॉन मस्क हे डोजचे अध्यक्ष बनल्याने याला अमेरिकेत विरोध होत आहे. ट्रम्प यांनी विद्यापीठांनाही सोडले नाही. विद्यापीठांना यहुदीविरोधी आणि हमास समर्थक सांगून टीका केली. विद्यापीठाला देण्यात येणारा फंडसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी रोखला. अमेरिकेतील अवैध प्रवाशांना अमेरिका सोडण्याचे फर्मान काढले आहे. हिंदुस्थानसह अनेक देशांतील हजारो नागरिकांना अमेरिका सोडावे लागले. नाटोपासून चार हात लांब राहण्याचे ट्रम्प यांनी ठरवले आहे. युव्रेन-रशिया युद्धात ट्रम्प हे रशियासोबत असल्याचे दिसत आहे.